पोटच्या मुलीवर तीन वर्षे बलात्कार करून त्याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या नराधम पित्याला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.
सांगली येथील रहिवाशी संजय शिंगटे (३४) याने या शिक्षेविरोधात केलेले अपील फेटाळून लावत न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्याची जन्मठेप कायम केली. आपल्याच मुलीवर आपण बलात्कार कसा करू शकतो, आपल्याला यात गोवले आहे, असा दावा करीत शिंगटेने शिक्षेला आव्हान दिले होते. मात्र मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल यातून शिंगटे याने एकदाच नव्हे तर अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड होत आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. या प्रकरणातील सर्वाधिक वाईट सत्य हे की मुलीवर बलात्कार करणारा तिचा जन्मदाताच आहे आणि गुन्हा नोंदवला गेला त्या क्षणी ही मुलगी अवघी १३ वर्षांची होती. त्याने ती ११ वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला होता. एका ११ वर्षांच्या निष्पाप आणि हतबल मुलीला जन्मदात्याकडूनच अशी वागणूक मिळणे दुर्दैवी असल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.
शिंगटे याला दोन मुली असून पीडित मुलगी ही मोठी मुलगी आहे. आईवडिलांमधील सततच्या भांडणाला कंटाळून ती लहानपणापासूनच आईच्या आईवडिलांकडे राहत असे. शिंगटे याची पत्नीही सततच्या भांडणामुळे घर सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे शिंगटे मुलींना भेटण्यासाठी नेहमी पत्नीच्या माहेरी जात असे आणि त्यांना फिरायला घेऊन जात असे. २५ सप्टेंबर २०१० रोजी शिंगटेच्या पत्नीने त्याला दूरध्वनी केला असता शिंगटेने तिला मुलीशी बोलायचे असल्याचे सांगितले. आपल्यामुळे बापलेकीमध्ये दुरावा नको म्हणून तिने त्यांचे बोलणे करून दिले. परंतु दूरध्वनीवरून शिंगटे मुलीशी अश्लील भाषेत बोलत असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने मुलीकडे विचारणा केली. त्या वेळेस तिने सर्व हकीगत आईला सांगितली आणि नंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला.