महिलांच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या पेहरावामुळेच बलात्कार होतात. महिलांवरील अन्य अत्याचारांसाठीही हीच बाब कारणीभूत आहे. त्यामुळे पुरुषांना दोष देण्याऐवजी महिलांना अशा प्रकारचा पेहराव करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी चंद्रकांत पालव या याचिकाकर्त्यांने बुधवारी उच्च न्यायालयात करून खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे अन्य याचिकाकर्ते व सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप घेतला. मात्र कपडय़ांचा आणि बलात्काराचा काही संबंध नसला तरी सर्वसामान्य माणसांना अशा प्रकरणांबाबत काय वाटते हे आपल्याला ऐकायचे आहे, असे नमूद करत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांनी पालव यांना पुढे बोलू देण्याची परवानगी दिली.
बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास महिलांचा अंगप्रदर्शन करणारा पेहराव जबाबदार आहे. एकेकाळी केवळ साडी नेसणाऱ्या महिलांचा पेहराव काळानुरूप बदलला आहे. आताच्या महिला अंगप्रदर्शन करणारे कपडेच अधिक घालतात. त्यामुळे बलात्कार व महिलांवरील अत्याचारांमध्ये अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे पुरुषांना दोष देण्याऐवजी महिलांच्या या अंगप्रदर्शन करणाऱ्या पेहरावावरच मज्जाव करण्याची गरज आहे. महिला याच महिलांवरील अत्याचारासाठी जबाबदार असल्याचा आरोप पालव यांनी केल्यानंतर याचिकाकर्त्यांचे वकील राजीव चव्हाण, मारूख एडेनवाला, या प्रकरणी माधव जामदार, एवढेच नव्हे तर सरकारी वकील गीता शास्त्री आणि पी. पी. काकडे यांनी पालव यांच्या आरोपांना तीव्र विरोध केला. या वकिलांनी महिलांवरच त्यांच्यावरील अत्याचाराचे खापर फोडणे चुकीचे असल्याचे म्हटले. त्यावर पेहराव आणि बलात्काराचा संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळेस अशा प्रकरणांबाबत सर्वसाधारण लोकांना काय वाटते हे आम्हाला ऐकायचे आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने पालव यांना बोलू देण्यास सांगितले.