बदलत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असले, तरी त्यांच्याकडील साधने मात्र तशी जुनीच आहे. ही गरज ओळखून वसईच्या एका तरुणाने पोलिसांसाठी एक खास बुलेट मोटारसायकल तयार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, रेकॉर्डर, लॅपटॉप, प्रिंटर, प्रथमोपचार, संगणीकृत डेटा स्टोरेज, वॉकी टॉकी, नाईट व्हिजन कॅमेरे आदी साऱ्या आधुनिक सुविधा या एका मोटारसायकलमध्ये देण्याचा यशस्वी प्रयत्न या तरुणाने केला आहे.
  एखादी घटना घडली की, कुठल्याही कानाकोपऱ्यात मुंबई पोलिसांना तात्काळ पोहोचावे लागते. तेथे पोहोचल्यावरही परिस्थिती हाताळावी लागते आणि पुरावे गोळा करावे लागतात. पण साधनसामुग्रीची कमतरता पोलिसाना जाणवते. हे ओळखून वसईच्या जेरीथ गॅब्रिएल या तरुणाने एक अत्याधुनिक बुलेट मोटारसायकल तयार केली आहे. खास पोलिसांची कार्यपद्धती लक्षात घेऊन गॅब्रिएलने त्यात बदल केले आहे.
गॅब्रिएलने या मोटारसायकलच्या परवानगीची फाईल काही वर्षांपूर्वी मंत्रालयात पाठवली होती. मात्र मंत्रालयाच्या आगीत ही फाईल जळली. आता मुंबई पोलीस दलात या मोटारसायकलचा समावेश करण्यासाठी त्याने सोमवारी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली. ही एका मोटारसायकल बनवायला त्याला एक महिना लागला.  पोलिसांकडून मंजुरी मिळाल्यास ही मोटारसायकल बीट मार्शल वापरू शकणार आहेत.

* या मोटरसायकलीच्या मागेपुढे दोन सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, नाईट व्हिजन कॅमरे, वॉकी टॉकी चार्जर, लॅपटॉप, प्रथमोपचार पेटी आदींची व्यवस्था आहे.
* तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारे साहित्य, एखाद्या संशयिताची माहिती पडताळण्यासाठी संगणीकृत डाटा स्टोरेज आदींचाही समावेश आहे.
* ही मोटारसायकल जीपीएस यंत्रणेद्वारे पोलीस मुख्यालयामधील केंद्रीय यंत्रणेशी जोडलेली असेल.
* या मोटारसायकलचा खर्च साडेचार ते पाच लाख रुपये आहे.
* केवळ एकच व्यक्ती त्यावर बसू शकणार आहे.