जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान

गेले चार दिवस तापत असलेल्या हवेने गुढीपाडव्याला कळसाध्याय गाठला. रायगड जिल्ह्य़ातील भीरा येथे तब्बल ४६.५ अंश से. कमाल तापमान नोंदवले गेले. जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये मंगळवारी भीराचा दुसरा क्रमांक होता. न्यूझीलंडजवळील सामोआ येथे जगातील सर्वाधिक ४९.६ अंश से. तापमान होते.

अकोल्याचा या यादीत ११ वा क्रमांक होता. तेथे कमाल तापमान ४३ अंश से. नोंदले गेले. राज्याच्या इतर भागातही कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली. पुणे, जळगाव, मालेगाव, सोलापूर यांच्यासह नाशिक व सातारा येथेही कमाल तापमान ४० अंश से. वर पोहोचले. मराठवाडा व विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंश से. वर राहिले. त्यामानाने कोकणातील कमाल तापमान मंगळवारी काहीसे कमी झाले होते.

पाण्यावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या भीरा येथे कमाल तापमान नेहमीच जास्त राहते. मात्र यावेळी अकोल्याला मागे काढत भीरा येथे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. मंगळवारी या परिसराच्या सरासरी कमाल तापमानात तब्बल ७.५ अंश से. ची वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात मंगळवारी उष्णतेची लाट असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला. मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेले काही दिवस तापमान ४० अंश से. वर जात होते. मंगळवारी तर नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेली ठिकाणेही तापली.