हिरानंदानी रुग्णालयातील मूत्रपिंड घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणी अटक झालेल्या पाचही डॉक्टरांना जामीन मिळाला असला तरी या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. या तपासात रुग्णालयातील पाच संशयास्पद प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या पाचही प्रकरणांतील दाते संशयास्पद असून हा या घोटाळ्याचाच भाग असल्याचा संशय आहे. याबाबत आवश्यक ती कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून संबंधित दात्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मूत्रपिंड घोटाळ्याची चौकशी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. मूत्रपिंड घोटाळ्यात डॉक्टरांना अटक झाल्यानंतर पोलिसांवर टीका झाली होती. डॉक्टरांना विनाकारण त्रास द्यायचा हेतू असता तर या डॉक्टरांना जामीनही मिळू शकला नसता, याकडेही तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.