मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोणताही घोळ न होता परीक्षा सुरळीत पार पडली असा एकही दिवस पाहावयास मिळत नाही. शनिवारी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका मिळाली नाही म्हणून एका विद्यार्थ्यांला थेट विद्यापीठाचा परीक्षा विभाग गाठावा लागला. त्यानंतर अभिसभा सदस्यांच्या मध्यस्थीनंतर त्या विद्यार्थ्यांला परीक्षा देता आली.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन केंद्रातील तृतीय वर्ष कला शाखेतील एका विद्यार्थ्यांला ‘इतिहास’ या विषयासाठी वांद्रे येथील चेतना महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आले होते. परीक्षेची वेळ दुपारी तीनची होती. हा विद्यार्थी वेळेअगोदरच परीक्षा केंद्रावर पोहोचला. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येत आहेत, पण आपल्याला प्रश्नपत्रिका दिली नाही म्हणून त्याने पावणेतीन वाजता महाविद्यालयातील प्रशासनाकडे चौकशी केली. त्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याने तुझ्या विषयाची प्रश्नपत्रिका आली आहे. मात्र ती काढून देण्यासाठी आता प्राचार्य किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याचे सांगितले.
हताश विद्यार्थ्यांने वाट पाहून थेट कालिनाचा रस्ता धरला आणि तो दूर व मुक्त अध्ययन केंद्रात गेला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला थेट परीक्षा विभागात नेले. तेथील उपकुलसचिव पराड यांनी सर्व माहिती जाणून घेतली आणि संबंधित परीक्षा केंद्रावर दूरध्वनी करून संपर्क साधला.
येथे प्रश्नपत्रिका आली आहे, पण पासवर्ड वापरून ती काढून घेण्यास पासवर्ड माहिती असलेले प्राचार्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख महाविद्यालयात नसल्यामुळे प्रश्नपत्रिका देण्यात आली नसल्याचे पराड यांना सांगण्यात आले. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या अधिसभा सदस्यांनी या विद्यार्थ्यांला प्रश्नपत्रिका काढून देऊन दूर व मुक्त अध्ययन केंद्रात परीक्षा लिहिण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांला परीक्षा देण्यास अनुमती मिळाली आणि ३.४५ वाजता त्याची परीक्षा सुरू झाली.
या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कालिना संकुलाच्या जवळ होते म्हणून तो तेथे वेळेवर पोहोचू शकला, पण जर हेच परीक्षा केंद्र लांब असते, तर त्याला वेळेवर पोहोचणे शक्यच झाले नसते, अशी प्रतिक्रिया अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. या प्रकारानंतर सावंत यांनी भरारी पथक बंद केल्यानंतर परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी काय उपाय योजण्यात आले आहे याबाबत विचारणा केली असता संयुक्त केंद्र प्रमुखाची नेमणूक करण्यात आल्याचे परीक्षा विभागाने त्यांना सांगितले. त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही का, यावर विद्यापीठ निरुत्तर झाल्याचे सावंत सांगतात.
भरारी पथक बंद केल्यासंदर्भात कुलगुरू अनभिज्ञच असल्याचेही सावंत यांनी नमूद केले. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा त्रास थांबविला पाहिजे. हा त्रास थांबवायचा असेल तर विद्यापीठाने पुन्हा भरारी पथके सुरू करावीत, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. झाल्याप्रकरणी सावंत यांनी पत्र देऊन विद्यार्थ्यांला पेपर न मिळण्यास कारणीभूत ठरलेल्या सर्वावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.