मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी हा निकाल दिला.  दरम्यान, या निकालानंतर लगेचच मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
अपघातावेळी सलमान खानच गाडी चालवत होता, असे पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले. बऱयाच वळणांनंतर अखेर १३ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
सलमान खानवर विविध कलमांखाली लावण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मद्यप्राशन करून गाडी चालविणे, सोबत वाहन परवाना न बाळगणे, एकाच्या मृत्युमुळे लावण्यात आलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने सांगितले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिक्षा सुनावण्यापूर्वी बचाव पक्षाची बाजू न्यायालयाने विचारली. यावेळी सलमान खानने कोणतेही म्हणणे मांडले नाही. त्यानंतर त्याचे वकील श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली.
सलमानविरोधात सरकारी पक्षाने एकूण २७ साक्षीदार तपासले. सचिन कदम नावाच्या एका सुरक्षारक्षकाला फितूर झाल्याचे सरकारी पक्षाने जाहीर केले. सलमानला घटनास्थळी पाहिल्याच्या साक्षीवरून कदम याने घूमजाव केले होते. सलमाननेही आरोपी म्हणून आपला जबाब नोंदवताना ‘त्या’ रात्री आपण नाही तर आपला चालक अशोक सिंह गाडी चालवत असल्याचा खळबळजनक खुलासा करून खटल्याला नवे वळण दिले. अशोक सिंह यानेही बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून अपघात सलमानच्या हातून नव्हे, तर आपल्या हातून तेही गाडीचा टायर फुटल्याने झाल्याचा दावा केला. एवढेच नव्हे, तर अंतिम युक्तिवादाच्या वेळेसही सलमानच्या वतीने धक्कादायक व खटल्याला वळण देणारे दावे करण्यात आले. त्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचा मृत्यू गाडीखाली चिरडून नाही तर गाडी क्रेनने उचलली जात असताना गाडी पुन्हा पडल्याने झाल्याच्या दाव्याचा त्यात समावेश होता. शिवाय सलमानने गाडीखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो घटनास्थळावरून स्वत: पळून गेला नव्हता, तर त्याला पळून जाण्यास सांगण्यात आल्याचाही दावा केला गेला होता.