रक्ताच्या संसर्गामुळे १ हजार १३२ रुग्णांना ‘एचआयव्ही’ची बाधा

एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ‘एचआयव्ही’ आजाराचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आले असले, तरी रक्ताच्या संसर्गामुळे व वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे (एका रुग्णासाठी वापरलेली सुई किंवा इंजेक्शनचा वापर अन्य रुग्णासाठी करणे) राज्यभरात अनेकांना ‘एचआयव्ही’ची बाधा होत आहे.

गेल्या पाच वर्षांच्या महाराष्ट्रातील ‘एचआयव्ही’ रुग्णांच्या आकडेवारीनुसार एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे. २०११-१२ या साली राज्यभरात ५४,२८९ ‘एचआयव्ही’ बाधित रुग्णसंख्या २०१६-१७ पर्यंत २५,१२० पर्यंत घटली आहे. मात्र वैद्यकीय तपासणीतील निष्काळजीपणामुळे नागरिकांना ‘एचआयव्ही’ची लागण होत आहे. गेल्या पाच वर्षांत रक्ताच्या संसर्गामुळे ११३२ रुग्णांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाली असल्याची गंभीर बाब माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत चेतन कोठारी यांनी समोर आणली आहे.

सध्या रक्त तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या एलायझा पद्धतीत रक्तदानानंतर एचआयव्हीच्या विषाणूंचे तीन महिन्यानंतर निदान होते. यासंदर्भात आपण राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढय़ांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत सांसर्गिक सुई व इंजेक्शनच्या वापरामुळे ५८१ जणांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाली आहे. तर गर्भवती मातेपासून ११,८४१ मुलांना ‘एचआयव्ही’ लागण झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ‘एचआयव्ही’ची आकडेवारी जास्त असली तरी महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी होत चालल्याचे आयसीटीसी (इंटिग्रेटेड कौन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टिंग सेंटर) च्या अहवालातून पुढे आले आहे.

रक्ताच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एलायझा’ तपासणीत ‘एचआयव्ही’चे तात्काळ निदान होत नाही. ‘एलायझा’ तपासणीत तीन महिन्यांच्या (विंडो पीरिअड) कालावधीत एचआयव्हीचे निदान होते. त्यामुळे सध्या रक्त तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एलायझा’ तपासणीपेक्षा अत्याधुनिक तपासणी सुरू करणे आवश्यक आहे व रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्याचा वैद्यकीय इतिहास, आजार आदी बाबींची विचारपूस केल्यानंतर रक्त घ्यावे, असे ‘थिंक फाऊंडेशन’च्या विनय शेट्टी यांनी सांगितले. सध्या मुंबईत अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जाते. या तपासणीअंतर्गत एचआयव्हीचे निदान पहिल्या दहा दिवसात होते. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे १००० रुपयांपर्यंत खर्च येतो. ही तपासणी खर्चिक असल्याने सरकारी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जात नाही, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.