रक्तपेढय़ांतील दूषित रक्त व रक्तघटकांच्या संक्रमणामुळे रुग्णांना एड्सची (एचआयव्ही) बाधा होण्याचे प्रकार अद्याप थांबले नसून वर्षभरात मुंबईतील १८ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्याच्या रक्ताच्या ‘एलायझा’ या तपासणीत पहिल्या टप्प्यातील एचआयव्हीचे निदान होत नसल्याने यासाठी अत्याधुनिक अशा नॅट (न्युक्लीक अ‍ॅसिड टेस्ट) तपासणीची आवश्यकता यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मुंबईतील एड्स नियंत्रण सोसायटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत ७८ जणांना रक्त व लाल रक्त पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा या रक्त घटकांच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे. यांपैकी २०१६-१७ या चालू वर्षांत १८ जणांना रक्तसंक्रमणातून एचआयव्हीची लागण झाली आहे. सध्या रक्ततपासणीसाठी ‘एलायझा’ या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. मात्र ‘एलायझा’ तपासणीत ‘एचआयव्ही’चे तात्काळ निदान होत नाही. ‘एलायझा’ तपासणीत तीन महिन्यांच्या (विंडो पीरिअड) कालावधीत एचआयव्हीचे निदान होते. त्यामुळे सध्या रक्ततपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एलायझा’ तपासणीपेक्षा अत्याधुनिक तपासणी सुरू करणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्याचा वैद्यकीय इतिहास, आजार आदी बाबींची विचारपूस केल्यानंतर रक्त घ्यावे, असा सल्ला ‘थिंक फाऊंडेशन’च्या विनय शेट्टी यांनी दिला. सध्या मुंबईत अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी (न्युक्लीअर अ‍ॅसिड टेस्ट) केली जाते. या तपासणीअंतर्गत एचआयव्हीचे निदान पहिल्या दहा दिवसांत होते. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे १२०० रुपयांपर्यंत खर्च येतो. ही तपासणी खर्चीक असल्याने सरकारी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जात नाही, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यभरात नॅट तपासणी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र यासाठी निविदा काढल्यानंतरही निधीअभावी नॅट तपासणी सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयांत सरकारने ठरविल्यानुसार १२०० रुपयांनी नॅट तपासणी केली जाते. मात्र एकाही सरकारी रुग्णालयात नॅट तपासणी उपलब्ध नाही. नॅट तपासणीसाठी वापरले जाणारे यंत्र अत्याधुनिक असून रक्त तपासणीदरम्यान वापरण्यात येणारे द्रव्य खर्चीक असल्याने या तपासणीसाठी जास्त किंमत आकारण्यात येते.

दर वर्षी सरकारी रुग्णालयात ४० हजार युनिट रक्त साठविले जाते. त्यानुसार प्रत्येक युनिट रक्ताची नॅट तपासणी करावी लागली तर वर्षांला साधारण ४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. प्रत्येक सरकारी रुग्णालयात मोफत नॅट तपासणी शक्य नसल्याने काही रुग्णालयांत खासगी केंद्र सुरू करावे अशी मागणी काही सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. पुण्यात एका स्वयंसेवी संस्थेतर्फे ८०० रुपयांमध्ये नॅट तपासणी केली जात आहे, त्यामुळे मुंबईतही अशा प्रकारे पर्यायांचा अवलंब करावा, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली होती.