दुबईला जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेने शुक्रवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला. इंडिगो विमान कंपनीच्या कार्यालयात सायंकाळी ६.१० च्या सुमारास एक निनावी दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सायंकाळी सात वाजता दुबईकडे रवाना होणाऱ्या (सहा ई-६१) या विमानात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या विमानाची तसेच विमानातील सर्व प्रवासी व सामानाचीही कसून तपासणी करण्यात आली. मात्र काही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.