‘सर्वासाठी घरे’ योजनेतून तीन लाख घरे बांधण्यास सुरुवात; फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याला बलशाली करण्यासाठी दुष्काळापासून मुक्तीबरोबरच, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, प्रदूषणापासून मुक्ती, भ्रष्टाचारापासून मुक्ती, करजंजाळ मुक्ती, अस्वच्छतेपासून मुक्ती, बिल्डरांच्या मनमानीपासून मुक्ती अशा ‘सप्तमुक्ती’ चा संकल्प सर्वानी करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, कर्जमाफीमुळे शासनाचे समाधान होणार नसून कर्जमुक्ती हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतीच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून शेती क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये सर्वासाठी घरे या योजनेंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक घरे बांधण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या काळात ग्रामीण भागात १२ लाख आणि शहरी भागात १० लाख घरे बांधून प्रत्येक बेघराला घर मिळेल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. २०१९ पर्यंत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या बेघरांना घर देण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना शासनाने केल्या आहेत. तसेच विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वानी संकल्पबद्ध होत प्रयत्न केला तर येत्या पाच वर्षांमध्ये बलशाली महाराष्ट्र आणि बलशाली भारत निर्माण होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.