अभिनेता संजय दत्तला सातत्याने कारागृहातून रजा कशी काय मिळते, याची चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फर्लो) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृह खात्याने याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
…हे तिघेच ‘पीके’सारखे चित्रपट करु शकतात-संजय दत्त
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्त कारागृहात आहे. २१ मे २०१३ पासून तो येरवडा कारागृहात आहे. या काळात संजय दत्तने स्वत:च्या पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी कारणे देत रजा मिळवली. त्यात मुदतवाढ घेतली. कारागृह प्रशासनाने त्याला याच आठवड्यात मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली. त्यानंतर तो पुन्हा कारागृहातून बाहेर पडून मुंबईमध्ये घरी गेला.
संजय दत्तला मिळालेल्या रजा :
– १ ऑक्टोबर २०१३ पासून १४ दिवसांची फर्लो मंजूर
– १४ ऑक्टोंबर २०१३ रोजी १४ दिवसांची मुदतवाढ
– २१ डिसेंबर २०१३ रोजी ३० दिवसांचे पॅरोल मंजूर
– २० जानेवारी २०१४ रोजी पॅरोलमध्ये ३० दिवसांची मुदतवाढ
– १८ फेब्रुवारी २०१४ रोजी पॅरोलमध्ये ३० दिवसांची मुदतवाढ
त्याने २१ मे २०१३ पासून वर्षभरात ११८ दिवस कारागृहाबाहेर काढले होते.