घसरत चाललेला महागाई दर, वाढत चाललेले कंपन्यांचे लाभांचे आकडे, बाजाराला चढलेली तेजीची झळाळी आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सामान्यांच्या खिशात खुळखुळू लागलेला बोनसचा पैसा, या पाश्र्वभूमीवर खरेदीचा उत्साह बाजारात ओसंडून वाहत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरील धनाधन खरेदीच्या या दिवसांत ग्राहकांनी घरापासून सोने-चांदी व समभागांच्या खरेदीला अधिकाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

गृहखरेदी खरेदीच्या दृष्टीने या दरम्यान थोडीफार हालचाल नोंदविली गेली असली त्याला गती आता मिळते आहे, अशी भावना अ‍ॅक्मे या स्थावर मालमत्ता समूहाचे जे. एस. ऑगस्टीन यांनी व्यक्त केली. दसऱ्याच्या निमित्ताने झालेले घर खरेदीचे व्यवहार यंदाच्या दिवाळी तसेच फार तर डिसेंबपर्यंत खेचले जाऊ शकतात; यंदा विकासकांनी मोठय़ा प्रमाणात सवलतीही देऊ केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांहून अधिक गृह मागणी नोंदली जात आहे, असेही ते म्हणाले.

समभाग खरेदी  २६,५०० च्या पुढील आणि सप्ताह उंची नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूक कलबाबत जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे मूलभूत विश्लेषण विभागाचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, देश स्तरावर सुधारणांना सुरुवात झाली आहे. त्याचाच परिणाम गुंतवणूकदारांच्या दृष्टिने संवेदनशील अशा समभाग खरेदी -विक्री व्यवहारावरही जाणवत आहे.

वाहन खरेदी वाहन क्षेत्रातही यंदा उत्साहाचे वातावरण आहे. वाहनांवरील उत्पादन शुल्क सवलत डिसेंबपर्यंत असल्याने खरेदीदारांकडून वाहनांची मागणी नोंदविली गेली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कंपन्यांनी त्यांची नवी उत्पादनेही सादर केली. सलग चार ते सहा महिन्यातील घसरणीनंतर वाहन उद्योगाने विक्रीतील वाढ नोंदविल्याचे निरिक्षण नोंदवितानाच यंदाचा सण वाहन उद्योगासाठी तारणारा ठरणार आहे, असे मत मारुती सुझुकीचे वितरक संदीपकुमार बाफना यांनी व्यक्त केले.

सोने खरेदी धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने १० ते १२ टक्क्य़ांनी कमी असल्याने मौल्यवान धातूची विक्रीदेखील ३० टक्क्य़ांपर्यंत वाढल्याची प्राथमिक माहिती सराफा वर्तुळातून दिली जात आहे. तर चांदीचे दरही वार्षिक तुलनेत यंदा २० टक्क्य़ांनी कमी झाल्याने पांढऱ्या धातूतील शोभेच्या वस्तू, पुजेचे साहित्य घेण्याकडे कल वाढल्याचे रोहन ज्वेलर्सचे शहा यांनी सांगितले.