भारतीय आयुर्वेद चिकित्सा केंद्रीय परिषद (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन – सीसीआयएम)च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. देशपातळीवरील या परिषदेचे एकूण ७० सदस्य असून महाराष्ट्रातील पाच जागांसाठी एकूण २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यात भाजप परिवाराशी संबंधित ‘वैद्यकीय विकास मंच’ने पाच सदस्यांचे पॅनल या निवडणुकीत उतरवले असून अन्य उमेदवार स्वतंत्रपणे उभे राहिले आहेत.
आयुर्वेद शिक्षण, आयुर्वेदाचा जागतिक प्रसार व मान्यता यासह विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असे मुद्दे घेऊन वैद्यकीय विकास मंच या निवडणुकीत उतरला असून मंचचे प्रमुख राजेश पांडे हे या निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे सांभाळत आहेत. देशपातळीवरील वैद्यकाच्या विविध परिषदांवर आपले नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपकडून अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ‘सीसीआयएम’च्या निवडणुकीकडे पाहावे लागेल, असे आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात एकूण ८० हजार आयुर्वेद डॉक्टर असून नोंदणी नूतनीकरण मुदतीत न केल्यामुळे या निवडणुकीत प्रत्यक्षात ५२ हजार मतदार असतील. आयुर्वेद शिक्षणावर नियंत्रण ठेवणे, महाविद्यालयांचे निकष, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चित करणे, विद्यार्थिसंख्या निश्चित करणे आदी कामे परिषद करीत असल्यामुळे सीसीआयएमवर जाणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत पोस्टल पद्धतीने मतदान केले जाणार आहे. आयुर्वेद क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या तज्ज्ञ आयुर्वेदाचार्याना ‘वैद्यकीय विकास मंच’मध्ये सामावून घेऊन खऱ्या अर्थाने अध्यापनाला गती देण्यासाठीच निवडणूक लढविण्यात येत असल्याचे पांडे यांनी सांगितले. मंचच्या पॅनलमधून डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. जयंत देवपुजारी, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. ए. सावंत आणि डॉ. ज्ञानेश्वर थोरात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.