हजारो भारतीयांना फसविल्यानंतरही हाँगकाँगस्थित क्यूनेट या कंपनीची सुरू असलेली प्रसिद्धी मुंबई पोलिसांनी हाणून पाडली. कंपनीच्या प्रसिद्धीचा ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आतापर्यंत क्यूनेट घोटाळ्यात पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. वनौषधी उत्पादने, हॉलिडे पॅकेज तसेच इतर वस्तूंच्या विक्रीसाठी आणि प्रसिद्धीसाठी साखळी तयार करून वेगवेगळे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे उकळणाऱ्या क्यूनेट आणि त्याची भारतातील फ्रँचायझी विहान डायरेक्ट मार्केटिंग सेलिंग लिमिटेड या कंपनीवर आर्थिक गुन्हे शाखेने २०१३ साली गुन्हा नोंदविला आहे. रविवारी या कंपनीची मार्केटिंग होणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. हरेश भरडा (३७), सुविजा पै (३६) आणि मोनिष भंडारकर (३१) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.