लोकसत्ताच्या बातमीने जाग आलेल्या रेल्वे पोलीस आुयक्तांनी चित्रा कुवर खोट्या गुन्ह्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. सह.आयुक्त रेडेकर चौकशी अहवाल सादर करणार आहेत.
रेल्वेस्थानके आणि गाडय़ांमध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची घोषणा एकीकडे रेल्वेमंत्री करीत असतानाच रेल्वेचेच पोलीस महिलांच्या सुरक्षेशी आणि आयुष्याशी कसा खेळ करतात, हे दाखवणारी घटना उजेडात आली आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींना खोटय़ा गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबण्याचे कृत्य डोंबिवलीतील रेल्वे पोलिसांनी केले. एवढेच नव्हे तर, त्यांना अख्खी रात्र तुरुंगात डांबून अमानुष मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा लाजीरवाणा प्रकारही या कायद्याच्या रक्षकांनी केला.
कायदा ‘भक्षकां’च्या तावडीतील रात्र!
  चित्रा कुवर (२२) आणि भाविका (२३) (नाव बदललेले) या मैत्रिणी गोरेगावमध्ये राहतात. मध्यमवर्गीय घरातील चित्रा एम. कॉम करते आहे. तर भाविकासुद्धा एम. कॉम झाली असून नालंदा महाविद्यालयातून एलएल.बी. करते आहे. २९ जून रोजी उल्हासनगर येथील मित्राच्या वाढदिवसासाठी त्या दोघींनी दादरहून दुपारी १ ची आसनगाव लोकल पकडली. डोंबिवलीला प्लॅटफॉर्म बदलून मागून येणारी गाडी पकडण्यासाठी त्या स्थानकात उतरल्या. तोच त्यांना साध्या वेशातील तीन महिला पोलीस हवालदारांनी पकडले. खाली पडलेले एक पाकीट तुम्ही मारले, असे सांगत त्यांनी या दोघींना डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याविरोधात खोटी फिर्याद दाखल करण्यात आली. चित्राच्या खिशात चोरलेला मोबाइल सापडला आणि भाविकाच्या बॅगेत चोरीची पर्स सापडल्याचे या फिर्यादीत लिहिले गेले. त्यानंतर या दोघींना तुरुंगात डांबण्यात आले. रेल्वे पोलीस ठाण्याच्या कोठडीत घडलेला प्रकार तर पोलीस या यंत्रणेवरील विश्वास उडवणारा आहे. २९जूनची अख्खी रात्र या दोघींना तुरुंगात घालवावी लागली. पोलिसांनी त्यांना त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधू दिला नाही की त्यांच्या मदतीला आलेल्या मित्रालाही भेटू दिले नाही. महिला पोलिसांबरोबरच पुरुष हवालदारानेही त्यांना पट्टय़ाने मारहाण केली. पोलिसांची अमानुष मारहाण आणि स्त्रीत्वाची लाज वाटावी, असे अश्लील संवाद यामुळे या दोघीही अक्षरश: हादरून गेल्या आहेत.
पोलिसांची उर्मट उत्तरे
*भाविका आणि चित्राने याविरोधात आता आणखी वरिष्ठ तसेच महिला आयोगाला लेखी तक्रार करून दाद मागितली आहे.
*महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी या मुलींची भेट घेऊन पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
*या संदर्भात चौकशीसाठी डोंबिवली रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांच्याशी संपर्क केला असता, ‘माहिती हवे असेल तर मला भेटायला या,’ असे उर्मट उत्तर त्यांनी दिले.
*एवढे गंभीर प्रकरण असताना रेल्वेचे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनी ‘मी पत्रकारांशी बोलत नाही. उपायुक्तांकडे जा’ असे उत्तर दिले.
दिल्लीत मी लोकसत्ताची बातमी वाचली. रक्त खवळलय, मी याबाबत लगेच रेल्वे मंत्री गौडा तसेच मेनका गांधींना सांगणार आहे. सगळे दोषी अधिकारी निलंबित होऊन कारवाई झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेणार- खा. पूनम महाजन, असे रेल्वे पोलिसांच्या गुंडगिरीवर पूनम महाजन यांनी फोन करून सांगितले.
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी तरूणींच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे  सांगितले.