बोरिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेचे उद्योग; उपलब्ध झालेल्या जागेचा ४ लाखांत ताबा

भूमाफिया, बांधकाम व्यावसायिक, सरकारी प्रकल्प मुंबईची हरितसंपदा नष्ट करण्यात आघाडीवर असताना आता दुसरीकडे सामान्य नागरिकही आपल्या सोयीसाठी वृक्षतोड करून शहराचा हरितपट्टा संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बोरिवलीतील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेने तर आवारात स्वतच्या खासगी वाहनांसाठी जागा करण्यासाठी एका वडाच्या मोठय़ा झाडाचीच कापणी केली. वडाचा बुंधा हलवून उपलब्ध झालेल्या जागेत आता सोसायटीच्या सदस्यांकडून ४ लाखांची अनामत रक्कम घेऊन त्या बदल्यात चारचाकी वाहने ठेवण्यासाठी सदस्यांना हक्काची जागा दिली जाणार आहे.

बोरिवली येथील दत्तपाडा रस्ता येथील कन्ट्री पार्क फेज-३ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीने आपल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेऊन ही वृक्षतोड केली. यासाठी सोसायटीने मुंबई महानगरपालिकेकडे वृक्षछाटणीची परवानगी घेतली आहे. मात्र, वृक्षछाटणीमध्ये झाडाच्या आड येणाऱ्या फांद्या छाटणे अपेक्षित असताना सोसायटीने वडाच्या जमिनीत घुसलेल्या अन्य पारंब्या या खोडापासून कापून टाकल्याचे दिसते आहे. या कापणीतून एक ट्रक भरेल इतकी लाकडेही सोसायटीबाहेर काढण्यात आली आहेत. या लाकडांची किंमतदेखील काही लाखात असण्याची शक्यता एका पर्यावरणवादी संस्थेने व्यक्त केली आहे.

ही झाडे तोडण्यासाठी सोसायटीला २५ हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सोसायटी आवारात लावलेल्या नोटिशीत नमूद केले आहे. येथे करण्यात येणाऱ्या वाहनतळासाठी चारचाकी वाहन असलेल्या सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनही या नोटिशीत केले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात आले असून वाहनासाठी स्वतची हक्काची जागा हवी असल्यास त्या बदल्यात तब्बल ४ लाख रुपयांची अनामत रक्कमही सोसायटी या सदस्यांकडून घेणार असल्याचे नोटिशीत स्पष्ट केले आहे. तसेच वृक्ष कापणीसाठी आलेला २५ हजारांचा खर्चही वाहन ठेवणाऱ्या सदस्यांकडून घेण्यात येणार आहे.

वाहनतळासाठी वडाच्या फांद्या छाटण्याऐवजी या झाडावरच कुऱ्हाड चालवण्यात आल्याबद्दल ‘पॉज’ या पर्यावरणवादी संघटनेने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याबाबत आर-मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, संबंधित सोसायटीला आम्ही झाड छाटणीची परवानगी दिली होती. ही परवानगी दिल्याप्रमाणे त्यांनी झाडाची छाटणी केली आहे किंवा नाही याची पाहणी आमचे अधिकारी करतील. त्या पाहणीनंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ.

‘कारवाई व्हावी’

ही वृक्ष छाटणी नसून कापणी आहे. पालिकेने संबंधितांना परवानगी देताना छाटणी करताना पाहणी करणे आवश्यक होते.  वाहनतळासाठी अशी गोष्ट करणे चुकीचे असून दोषींवर कारवाई करून त्याच जागेत झाडे लावण्यात यावीत, अशी मागणी ‘पॉज’ संस्थेचे सुनीश कुंजू यांनी केली.