जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाच्या तारखांमध्ये केला गेलेला बदल निस्तरताना राज्य शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ येत असतानाच १ मार्चला होणारी गणिताची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पुढे आल्याने बारावीचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोंधळामुळे बारावीचे आधीचेच वेळापत्रक परवडले, अशी भावना बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
१७ मार्चच्या जीवशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी चौथी-सातवीची शिष्यवृत्तीची परीक्षा आली आहे. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल १७ लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर जीवशास्त्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सुमारे तीन लाख. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ज्या परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी शिष्यवृत्ती आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा होणार आहेत तिथे मोठा गोंधळ उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अशा परीक्षा केंद्रांची माहिती मागविण्यास मंडळाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात अशी तब्बल ३० केंद्रे आहेत. अन्य ठिकाणी हा गोंधळ आणखी मोठय़ा प्रमाणावर असू शकतो. हा गोंधळ निस्तरण्यासाठी जीवशास्त्राची परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचा विचार मंडळाला करावा लागणार आहे.
रसायनशास्त्राचा पेपर २६ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने आधीच जेईईसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. जीवशास्त्राचा पेपर त्यानंतर घ्यायचा म्हटला तर तो ३० किंवा १ एप्रिलला घ्यावा लागेल. हा पेपर इतका पुढे ढकलला गेला तर बारावीची परीक्षा आणखी लांबून त्याचा ८ एप्रिलला जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच बारावीचे आधीचेच वेळापत्रक परवडले अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.
दुसरीकडे गणिताला सध्याच्या वेळापत्रकानुसार मिळणारे तीन दिवसांचे अंतर पाच दिवस करावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. गणिताची परीक्षा जीवशास्त्राचा पेपर रद्द झाला त्या दिवशी, म्हणजे ४ मार्चला घ्यावा, अशी सूचना केली जात आहे. मात्र, याच दिवशी दुपारच्या सत्रात अर्थशास्त्राचा पेपर होणार आहे. काही विद्यार्थ्यांना (विशेषत कॉमर्सच्या) गणित आणि अर्थशास्त्र हे दोन्ही पेपर द्यावे लागणार आहेत. या दोन्ही पेपरचे कठीण स्वरूप पाहता लाखो विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांना एकाच दिवशी सामोरे कसे जायचे, असा प्रश्न आहे. अर्थशास्त्राचा पेपर १७ मार्चला जीवशास्त्राच्या दिवशी घेतला तरी शिष्यवृत्ती परीक्षेची अडचण आहेच.
दोन भाषा वगळता राज्य शिक्षण मंडळ उर्वरित चार विषयांसाठी ४५ विषयांमधून कोणतेही विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देते. इतक्या मोठय़ा संख्येने विषय निवड करण्याची संधी देशातील कुठलेच शिक्षण मंडळ देत नाही. म्हणूनच वेळापत्रक आखताना मंडळाला फार काळजी घ्यावी लागते.
दोन पेपरांच्या तारखांमध्ये केला गेलेला बदल तसाही विद्यार्थ्यांच्या सोयीचा नाही. यामुळे बारावीची परीक्षा विनाकारण लांबत असून त्याचा परिणाम पुढील जेईई, नीट, एमटी-सीईटी आदी प्रवेश परीक्षांवर होत आहे.

आता वेळ विद्यार्थ्यांनी आपले मत मांडायची
बारावीच्या वेळापत्रकाबाबत पालक, शिक्षक, राज्य शिक्षण मंडळ, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांनी प्रसारमाध्यमांमधून मोठय़ा प्रमाणावर भूमिका मांडली. पण, या बदलांचा मोठा परिणाम ज्यांच्या करिअरवर होणार आहे, त्या विद्यार्थ्यांचे काय? विद्यार्थ्यांनी याबाबत आपली भूमिका मांडावी यासाठी लोकसत्ता आपले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांनी (पालकांनी नव्हे) बारावीच्या वेळापत्रकाबाबत आपले मत – pratikriya@expressindia.com  या पत्त्यावर नोंदवावे. विद्यार्थ्यांचा आवाज निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचविला जाईल.