गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्यावाढीचे प्रतिबिंब यंदाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीवरही उमटले आहे. बारावीत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कटऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बारावीच्या निकालानंतर पदवीचा अभ्यासक्रम हा करिअरची दिशा ठरवत असतो. त्यातच बीएमएम, बीएमएस, बी.एस्सी.-आयटी आदी  व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे पर्याय पारंपरिक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध झाल्याने तिथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. नोकरीच्या दृष्टीने सोयीस्कर असणारे व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत  आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड मोठय़ा प्रमाणात केली असल्याचे पदवी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून समोर आले आहे.

वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा ओढा व्यवस्थापनशास्त्राकडे (बीएमएस) असून १ लाख ५४ हजार ८२९ प्रवेशअर्ज या अभ्यासक्रमासाठी आलेले आहेत. तर ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी मास मीडियाच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. इच्छुक विद्यार्थी जास्त आणि जागा कमी अशी परिस्थिती असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांमध्ये चुरस आहे. परिणामी या अभ्यासक्रमांच्या कटऑफमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रुईया महाविद्यालयाचा बीएमएमचा गेल्या वर्षी ८८ टक्क्यांवर असलेला कटऑफ यंदा ८९ टक्क्यांवर गेला आहे, तर बीएमएसची कटऑफ ८८ वरून ९० टक्क्यांवर गेली आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयाचा बीएमएमचा कटऑफ ८१ वरून ९० टक्क्यांवर गेला आहे. तसेच बीएमएसचा कटऑफ ८४ वरून ९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४५ टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे आहे. सुमारे चार लाखांहून अधिक अर्ज वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी आले आहेत. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व्यवस्थापन शास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, मास मीडिया आदी अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन नोंदणीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. वाणिज्य शाखेसाठी यावर्षी १ लाख ३९ हजार ७३० जागा असल्यामुळे वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी रस्सीखेच होणार असून पसंतीचा अभ्यासक्रम मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदा कसरत करावी लागणार आहे. त्याखालोखाल बँकिंग अ‍ॅण्ड इंश्युरन्ससाठी ३४ हजार ६२२, अकाऊंटिंग व फायनान्स या अभ्यासक्रमांसाठी ९२ हजार ६३५ अधिक प्रवेशअर्ज दाखल झालेले आहेत.

विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी जवळपास ३ लाख प्रवेशअर्ज आलेले आहेत. यंदा ८० हजारांहून अधिकतर विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयाची निवड केली आहे. तसेच कॉम्प्युटर सासन्स विषयालाही सुमारे ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. या खालोखाल ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी कला शाखेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल वाढला आहे. विशेषत वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थी सर्वाधिक पसंती दर्शवीत आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे कटऑफ ही तुलनेने यावर्षी वाढलेले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना यंदा मनाजोगे माहविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.  – माधवी पेठे, प्राचार्य, डहाणूकर महाविद्यालय

untitled-2