मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांची नव्या जागांबाबत असमर्थता

बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जुलैमध्ये झाली. त्या परीक्षेचा निकाल बुधवारी लागून २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार का याबाबत प्रश्नच आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश कुठे द्यायचा आणि दिलाच तर अभ्यासक्रम कसा भरून काढायचा असा पेच महाविद्यालयांना पडला आहे. परीक्षेसाठी सव्वा लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील ३२ हजार ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी बारावीच्या फेब्रुवारीमधील परीक्षेचा निकाल फुगलेलाच होता. त्यात महाविद्यालयांमध्ये तुकडय़ा वाढवून न मिळाल्यामुळे आता जुलैमधील उत्तीर्ण  विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळणार का याबाबत साशंकता आहे. मुंबई, पुण्यातील अनेक महाविद्यालये आता प्रथम वर्षांला प्रवेश देण्यासाठी असमर्थता दाखवत आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच, तरी या विद्यार्थ्यांचे एका सत्राचे १८० तास पूर्ण कसे होणार, सत्र परीक्षांची तयारी कशी होणार याबाबतही प्रश्नचिन्हच आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचीही योजना होती. मात्र त्याची कार्यवाही देखील अस्पष्ट आहे.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हव्या आहेत, त्यांनी २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहेत. २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत गुणपडताळणीचे अर्ज करता येतील. http://www.mahresult.nic. येथे निकाल पाहता येणार आहे.