राज्यातील राजकारण्यांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करण्याची जादू केली आहे. ९० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर होतात, मात्र धरणे गायब आहेत. राज्यातील राजकारण्यांनी जी घोटाळ्यांची ‘जादू’ केली आहे, ती मनसे लवकरच उलगडून दाखवेल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केले.
प्रसिद्ध जादूगार भूपेश दवे यांच्या दादर येथील ‘मॅजिक अकादमी’चे उद्घाटन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करण्याची जी जादू केली आहे ,त्याचा बुरखा आपण लवकरच फाडू ,असेही राज म्हणाले. राजकारणी आणि जादूगारांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोघेही ‘चलाखी’ करतात, असे राज यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जादू ही कला असून त्याचा प्रसार करण्यासाठी दवे यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पाला शुभेच्छा देताना जादूगारांपेक्षा आपल्याकडे बुवाबाजी करून चमत्कार करणाऱ्यांचीच जास्त चलती असल्याचे राज म्हणाले. यावेळी आमदार नितीन सरदेसाई व नगरसेवक संदीप देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.     

बाळासाहेबांची तब्येत आणि दिवाळी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीविषयी विचारले असता, माझ्या घरी दिवाळीनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे, तसेच ‘मातोश्री’वरही रोषणाई करून आकाशकंदीलही लावण्यात आला आहे आणि यातच सारे काही आल्याचे सांगून राज यांनी अधिक काहीही बोलण्यास नकार दिला.