दुष्काळी परिस्थितीमुळे उद्योगांचे पाणी कमी केले असताना औरंगाबादमध्ये बियर व दारू कंपन्या आणि बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांना मात्र पाणी वाढवून दिले आहे. बियर आणि औषधे यातील जीवनावश्यक काय, हे सरकारला कळत नाही. मंत्र्यांच्या चार जिल्ह्य़ांमध्ये ९० टक्के चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून सत्ताधाऱ्यांना पैसा कमावण्यासाठी त्या आंदण दिल्या, असे आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केले. राज्याच्या इतिहासातील भीषण दुष्काळाचा ‘कलंक’ आपल्या नावे लिहिला जाऊ नये असे वाटत असेल, तर दुष्काळ निवारणासाठी ९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून तातडीने दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत पोचवावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारच्या नियोजनशून्यतेमुळेच राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ असल्याची टीका विधानपरिषदेत दुष्काळावरील चर्चेला सुरुवात करताना तावडे यांनी केली. औरंगाबादमध्ये मिलेनिअम बियर इंडिया लि., औरंगाबाद ब्रेव्हरीज, फोस्टर इंडिया लि., इंडो-युरोपियन ब्रेव्हरिज कंपन्यांचा पाणीपुरवठा जानेवारीच्या तुलनेत नोव्हेंबर १२ मध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढवून दिल्याची आकडेवारीच तावडे यांनी सभागृहासमोर मांडली. पाण्याचा दुष्काळ असताना जनतेने भरपूर दारू व बिअर प्यावी, असे सरकारला वाटत असावे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. चारा गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी १५ दिवसांत करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले. पण प्रत्यक्षात चौकशी झालीच नाही, असे तावडे यांनी निदर्शनास आणले. स्कूटर, दुचाक्या आदींचे बोगस क्रमांक देऊन चारा वाहतूक केल्याचे दाखविण्यात आले आहे.
 पिण्याच्या पाण्याची परिस्थिती इतकी भीषण आहे की, टँकर गावात आल्यावर त्यावर सर्वजण तुटून पडतात आणि ७-१० मिनीटांत तो रिकामा होतो. त्यातून पाईपने पाणी घेण्याचीही अनेकांची ऐपत नसल्याचे दारुण चित्र आहे. शासकीय टँकरसाठी डिझेलची खोटी बिले देऊन जनतेच्या निधीवर डल्ला मारला जात आहे. दुष्काळी भागातील ३० लाख पशुधनापैकी केवळ तीन लाख पशूंना आपण चारा देत आहोत, असे कोरडे ओढत तावडे यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला.