पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. संमेलनाच्या मार्गदर्शन समितीचीही स्थापना आणि बैठकही झालेली नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, संमेलनाचे निमंत्रक व आयोजकांना साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित करण्याची ‘घुमानघाई’झाली आहे. मुंबईत सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ निवासस्थानी या बोधचिन्हाचे प्रकाशन होणार आहे.
सर्वसाधारणपणे संमेलनाच्या बोधचिन्हासाठी कलाकार, चित्रकार किंवा नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून बोधचिन्हे मागविली जातात. त्यातून संमेलनाची मार्गदर्शन समिती वा निवड समिती बोधचिन्हाची निवड करते, अशी प्रथा आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि मार्गदर्शन समितीची स्थापना झाल्यानंतरच याबाबतची प्रक्रिया सुरू होते. मात्र या वेळी त्याचे पालन केले नसल्याबद्दल आणि एका राजकीय पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी बोधचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘सरहद’ ही संस्था संमेलनाचे आयोजक असून पंजाबमधील घुमान ग्रामपंचायत, बाबा नामदेव दरबार समिती आणि घुमानमधील अन्य संस्था, गुरुद्वारा तेथील संयोजनाचे काम पाहणार आहेत.

बोधचिन्ह, त्याचे अनावरण हा विषय महामंडळाच्या अखत्यारित येत नाही. ती जबाबदारी निमंत्रक आणि आयोजक संस्थेची आहे. त्यामुळे याविषयी तुम्ही आयोजकांनाच विचारा.
– डॉ. माधवी वैद्य, अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

आयोजक संस्था आणि महामंडळ पदाधिकारी यांनी बोधचिन्हाच्या अनावरणाचा निर्णय घेतला आहे. संमेलनाच्या निमित्ताने विविध कामे आम्ही सुरू केली असून, त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून बोधचिन्हाचे अनावरण होत आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या आणि आस्था असणाऱ्या साऱ्याच मंडळींची आम्ही मदत घेणार आहोत.
संजय नहार, सरहद संस्था