पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरून शिवसेनेने या सोहळ्याचे आयोजक आणि ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर केलेल्या टीकेचा त्यांनी सौम्य शब्दांत मंगळवारी प्रतिवाद केला. सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानी एजंट असल्याची जळजळीत टीका शिवसेनेने केली होती. त्याला उत्तर देताना सुधींद्र कुलकर्णी यांनी आपण एजंट नक्कीच आहोत. पण पाकिस्तानचे एजंट नसून दोन्ही देशांमध्ये शांती राहावी, यासाठी कार्य करणारे एजंट आहोत, असे म्हटले आहे.
मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोण चुकीचे आणि कोण बरोबर हे लोक ठरवतील. शिवसेनेने व्यक्त केलेली मते हे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याबद्दल मला आदर आहे. पण त्याचवेळी शिवसेनेनेही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संबंधांवर मी काही बोलणार नाही. आम्ही काल आयोजित केलेला कार्यक्रम हा पूर्णपणे अराजकीय स्वरुपाचा होता. त्याचबरोबर आमची संस्थाही अराजकीय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.