सध्या देशात निवडणुकीशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही. मात्र, निवडणुकीत माझ्या पक्षाचे आमदार निवडून येवोत किंवा न येवोत, मला त्याने कोणताही फरक पडत नाही. माझी सत्ता ही रस्त्यावर आहे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगपालिकांचे रणशिंग फुंकले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्यांविषयी जागृत राहून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच सल्ला दिला. राज यांनी आपल्या भाषणात कायदा-सुव्यवस्था, जीएसटी आणि अॅट्रॉसिटी कायदा अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्यासाठी पर्यायी कायदा आणण्याची गरज आहे. जातीनिहाय, जन्मनिहाय कायदे हवेतच कशाला, असा सवाल उपस्थित करत यावेळी राज यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आरक्षण हे आर्थिक निकषांवरच दिले गेले पाहिजे, असा विचारही यावेळी राज यांनी मांडला. यावरून माझ्यावर टीका झाली तरी चालेल. मात्र, महाराष्ट्राच्या हिताचे जे आहे ते मी बोलणारच, असे राज यांनी सांगितले.

यावेळी राज यांनी वस्तू व सेवा कर विधेयकाच्या (जीएसटी) मुद्द्यावरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केले.  जीएसटी म्हणजे देशातील सर्वकाही केंद्रशासित करण्याचा डाव आहे. केंद्राला प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण स्वत:कडे हवे आहे. शहरांना आणि राज्यांकडे काहीच ठेवायचे नाही. उद्या केंद्राने महानगपालिकेला पैसै दिले नाही तर, शहरांचा दैनंदिन कारभार कसा चालणार? वाहतुकीचे नियम मोडले तर भरावा लागणार दंड वाढवायचा असेल तर केंद्रातून परवानगी लागते. राज्यांना इतके साधे अधिकार नसतील तर राज्य कसे चालणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.