विधानसभा निवडणुकीत राज्यात तिसऱया क्रमांकावर फेकले गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतील गटनेतेपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालीच कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. पक्षाचे अवघे ४२ उमेदवार विजयी झाले. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेतील गटनेत्याची निवड करण्यासाठी कॉंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक गुरुवारी मुंबईत होते आहे. पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आले आहेत. या बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी आपण गटनेतेपदाच्या चर्चेत नसल्याचे स्पष्ट केले.
विधानसभेतील गटनेतेपदासाठी नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात चुरस आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील गटनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने आपले मत टाकले असून, त्यांच्याकडेच हे पद देण्याची मागणी केली असल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर अनुभवी व्यक्ती बसविण्याचा पक्षनेतृत्त्वाचा विचार आहे.