नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. राणेंनी निवडणुकी आधी मला दुरध्वनी केला होता तेव्हा, मी त्यांना ही निवडणूक लढवू नका, असे सांगितले होते. नुकताच एका निवडणुकीत तुमचा पराभव झाला आहे आणि वांद्रेचा मतदारसंघही तुमच्यासाठी पूर्णपणे नवा आहे. तेव्हा तुमच्यासारख्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदी राहिलेल्या मातब्बर नेत्याने ही निवडणूक लढवणे योग्य नाही, असे आपण राणेंना सुचविल्याचे अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
परंतु, मी बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी असताना या मतदारसंघात काम केले आहे. याशिवाय, या भागात कोकणी मतदारही मोठ्या प्रमाणावर असून तो मला ओळखतो. त्यामुळे काहीही झाले तरी ही निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय अंतिम असल्याचे राणे त्यावेळी म्हणाले होते. शेवटी तो राणेंचा वैयक्तिक निर्णय होता, असे अजित पवारांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभव स्विकारावा लागला होता.
दरम्यान, अजित पवार यांना सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाबाबत विचारले असता, त्यांनी योजनाबद्ध प्रयत्न केल्यामुळे हा विजय मिळाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेला पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीवेळी नीट योजना आखून काम केल्याचे त्यांनी म्हटले.