एरव्ही आपणच काढलेल्या इतरांच्या प्रतिमांमध्ये रंगलेले त्यांचे विश्व. ग्लॅमरच्या विश्वात एक छायाचित्रकार म्हणून आपण कमावलेला नावलौकिक जपत जगणारे, त्या आनंदी आठवणींमध्ये रमणारे जगदीश माळी. एक सज्जन माणूस अशीच आजही त्यांची मित्रांमध्ये, परिचितांमध्ये ओळख आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी ते वर्सोव्यात भ्रमिष्टासारखे फिरताना आढळले आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींनी त्यांचे भावविश्वच ढवळून निघाले आहे. हे काय चालले आहे, काय छापून येते आहे, असे अस्वस्थपणे आपल्या मित्रांना विचारणाऱ्या जगदीश माळींचे आता ‘मला शांत राहू द्या.. ’ एवढेच म्हणणे आहे.
एकेकाळी सतत चर्चेत असणाऱ्या, प्रकाशझोतात असणारे जगदीश माळी सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सलमानच्या ‘बीईंग ह्युमन’ या संस्थेच्या सदस्यांनी माळी यांना लोणावळ्यातील त्यांच्या राहत्या घरी सोडले, असे सांगितले जाते आहे. एकीकडे विपन्नावस्था आल्यामुळे ते असे भ्रमिष्टासारखे फिरत आहेत, त्यांची मुलगी अंतरा हिने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशाप्रकारच्या चर्चानी वातावरण बिघडलेले असताना यात आनंदाचा हलका किरण सोडणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा वाढदिवस. शुक्रवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जगदीश माळींची तब्येत ठीक नसल्याने ते फोनवर बोलू शकणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, काही मोजक्या मित्रांनी आणि निकटवर्तीयांनी एकत्र येऊन लोणावळ्यातील हॉलिडे होममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केल्याची माहितीही देण्यात आली.
जगदीश माळी यांचा जवळचा मित्र आणि अभिनेते मिलिंद गुणाजी यांनीही माळी बऱ्यापैकी सावरले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांची प्रकृती अजूनही चांगली नाही. त्यांना खूप वर्षांपासून लिव्हरचा त्रास आहे. आणि औषधे घेण्यास विलंब झाल्यानंतर त्यांची भ्रमिष्टासारखी अवस्था होते. याच अवस्थेत ते चुकून घराबाहेर पडले असतील, असा आपला अंदाज असल्याचे मिलिंद गुणाजी यांनी  ‘लोकसत्ता’ला सांगितले. मी जगदीशशी बोललो आहे. तो अतिशय सज्जन आणि चांगला माणूस आहे. आपल्या हातून काय घडले आहे हे त्याच्या अजूनही लक्षात आलेले नाही. आपल्याबद्दल असे का बोलले जात आहे, याची विचारणाही त्याने केली.