मी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही, असे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केले. ते गुरूवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर नारायण राणे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षातील विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनीच मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या पसरवल्याचा आरोप राणेंनी केला. त्यामुळेच मी आज स्वत:ची भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा होत नाही. मी अधिवेशनादरम्यान सभापतींना विचारूनच मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, त्यानंतर मी काँग्रसे सोडणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या. हे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. मी काँग्रेसमध्ये आल्यापासून राणे कुटुंबियांना वेगवेगळ्या पद्धतीने डावलण्याचे प्रयत्न काहीजणांकडून केले जात आहेत. मात्र, या सगळ्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आमचा पिंड हा संघर्षाचा आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणेंचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात काँग्रेसचे पानिपत झाले होते. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे तर विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे नारायण राणे यांचे पक्षातील स्थान डळमळीत झाले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे पक्षातील महत्त्व वाढले होते. नारायण राणे यांनीदेखील अनेकदा अशोक चव्हाण यांच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. काँग्रेसमध्ये नारायण राणे यांची घुसमट होत असल्याची चर्चा रंगू लागली होती. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाला त्यांनी लावलेली हजेरी , तिथून परतताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने केलेला प्रवास आणि नितेश राणे यांचे नाव निलंबित आमदारांच्या यादीतून वगळले जाणे, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता होती.