सर्व काही सन्मानपूर्वक होत असेल तरच शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला जाऊ, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. येत्या २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे भूमिपूजन होत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेल्यामुळे उद्धव ठाकरे या भूमिपूजनाला उपस्थित राहणार किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि मेट्रो भूमीपूजन समारंभात मोदींशेजारी आसन असले तरच उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अन्यथा नाही, अशी भूमिका सेनेकडून घेण्यात आली होती. मात्र, राजशिष्टाचारांच्या अडथळ्यामुळे उद्धव यांना मोदींच्या शेजारचे आसन मिळणे कठीण होते. त्यामुळे उद्धव या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, उद्धव यांनी आज याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला अनुपस्थित राहण्याचे कारण नाही. सर्व काही सन्मानपूर्वक होत असेल तर भूमिपूजनाला जाणार. चांगल्या कामासाठी आमचा नेहमीच पाठिंबा असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री आणि मी संपर्कात आहोत. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याची गरज नाही, असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना राजशिष्टाचार बाजूला सारुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्याशेजारी आसन दिले होते. हा निर्णय पंतप्रधानांचा असतो. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, राज्यात सध्या तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मान छत्रपतींच्या वंशजांना मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास उपस्थित राहणार असले तरी जलपूजन व भूमिपूजनाचा मान छत्रपतींचे वंशज असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शाहू महाराजांचे वंशज असलेले राज्यसभेतील खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिला जाणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गिरगाव चौपाटीपासून समुद्रात सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील १५.८६ हेक्टर जागेवर २१० फुटी शिवरायांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा तितकाच भव्य करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी गड- किल्ले संवर्धनाचा वसा घेतलेल्या संस्था, संघटनांनाही आवर्जून बोलाविले जाईल. तसेच राज्यातील सत्तरहून अधिक पवित्र ठिकाणांहून माती आणि पवित्र नद्यांमधील पाणी आणले जाणार असल्याचे समजते. त्यात शिवनेरी, रायगड, पन्हाळा, तुळजापूर, सिंदखेड राजा, देहू – आळंदी, शिखर शिंगणापूर आदींचा समावेश आहे.