शिवसेनेचा प्रखर राष्ट्रवाद आणि स्वाभिमानी वृत्तीला भाजप कंटाळली असेल तर त्यांनीच सत्तेतून बाहेर पडावे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबई येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. शिवसेनेचे मंत्री सत्तेतून बाहेर पडणार का, असा प्रश्न यावेळी राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा दरवेळी शिवसेनेच्याच मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा का करावी, असा प्रतिसवाल राऊत यांनी उपस्थित केला. आमचा प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाला भाजप कंटाळली असेल तर त्यांनीच सत्तेतून बाहेर पडावे, असे राऊत यांनी म्हटले.
राज्याचे मंत्रिमंडळ हे एकट्या भाजपाचे नाही. त्यांना स्वत:च्या बळावर सरकार बनवायचं असेल तर त्यांनी तसे करावे. मात्र, त्यासाठी भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसची साथ त्यांना चालणार आहे का याचा विचार भाजपने करावा, असेही राऊत यांनी सांगितले.
राज्यातील सत्ता दोघांची आहे आणि भाजपला जर जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रद्रोही भूमिका घेणारे मुफ्ती मोहम्मद सईद चालतात तर राष्ट्रभक्तीची भूमिका घेणारी शिवसेना का नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना शिवसेनेमुळे महाराष्ट्राची बदनामी कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी केली.