देशभरातील १८ ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’सह (आयआयटी) केंद्रीय तंत्रशिक्षण संस्थांकरिता यंदा प्रथमच एकत्रितपणे राबविण्यात आलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आयआयटीपुरती तरी मंगळवारी सायंकाळी उशीरा संपली. यापैकी वाराणसी-आयआयटीतील ४३ रिक्त जागा वगळता सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. देशातील १८ आयआयटीतील १०,००६ जागांचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश होता. यापैकी वाराणसी वगळता सर्व आयआयटीमधील सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी नव्याने सुरू झालेल्या तिरूपती आणि पालकड येथील दोन आयआयटीमधील एकूण १२० जागाही पहिल्याच वर्षांत भरल्या गेल्या आहेत.
आयआयटीतील ४३ रिक्त जागा या बायो सायन्स इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटीकल इंजिनिअरिंगच्या आहेत. आयआयटीचे शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होईल. परंतु, ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एनआयटीएस) आणि इतर केंद्रीय शिक्षण संस्थांमधील २५०० रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया मात्र सुरूच राहणार आहे. २२ जुलैपासून या जागांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.