आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून दिशा-दर्शनाचा अनोखा उपक्रम
गेट-वे ऑफ इंडिया येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांची येथून अलिबाग, मांडवा, एलिफंटा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशीबोटी शोधताना पुरती दमछाक उडते. गर्दीमुळे कोणाचेच कुणाला कळत नाही आणि मग पुढे मोठा गोंधळ उडतो. प्रवाशांची धांदल कमी करण्याकडे पालिका प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने आता आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनीच या कामी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी गेट वे येथे दिशादर्शनाची नवी यंत्रणा उभी केली असून त्या द्वारे प्रवाशांना बोटींच्या थांब्यांची ताजी माहिती तत्काळ मिळणार आहे.
गेट-वे ऑफ इंडियाचे वैभव पाहण्यासाठी मुंबईत देशांतर्गत प्रवाशांसह परदेशातूनही प्रवासी येत असतात. हे प्रवासी येथून मांडवा, अलिबाग, जेनपीटी, एलिफंटा, मुंबई दर्शन फेरी आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी बोटींचा पर्याय निवडतात. यासाठी गेट-वे येथे चार प्रवेशद्वारे आहेत. मात्र, कोणत्या ठिकाणची बोट कुठल्या प्रवेशद्वारावर येणार याबाबत माहिती होत नसल्याने प्रवाशांना इकडे-तिकडे धावाधाव करावी लागत असते. प्रवाशांनी करावी लागणारी ही धावाधाव लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतील ‘इंडस्ट्रियल डिझाइनिंग कोर्स’च्या पहिल्या वर्षांच्या पंधरा विद्यार्थ्यांनी अभिनव प्रकल्प राबवला आहे. गेट-वे ऑफ इंडिया येथील बोटी पकडण्यासाठीच्या प्रवेशद्वारांवर या विद्यार्थ्यांनी कोणती बोट कुठे जाणार याची दिशादर्शन यंत्रणा उभी केली आहे. प्रवाशांची धावाधाव लक्षात घेता या प्रकल्पाही विद्यार्थ्यांनी ‘इकडे-तिकडे गेट-वे’ हे नाव दिले आहे. याबाबत सांगताना इंडस्ट्रियल डिझाइनिंग कोर्सचे विभागप्रमुख बी. के. चक्रवर्ती म्हणाले की, असा पहिलाच प्रकल्प करण्यात आला असून याद्वारे प्रवाशांना आपले स्थळ निवडण्यात मदत होईल. मात्र, हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प असून यात अंतिम बदल करून आम्ही तो कायमस्वरूपी स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
दिशा-दर्शन होते कसे?
गेट-वे ऑफ इंडिया येथे मांडवा, अलिबाग, जेनपीटी, एलिफंटा, मुंबई दर्शन फेरी आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी बोटी येतात. येथे असलेल्या चारपैकी कोणत्याही प्रवेशद्वारावर या बोटी येतात. या पाच ठिकाणचे पाच रंग ठरवण्यात आले असून त्याचा एक मनोरा उभा करण्यात आला आहे. या मनोऱ्याच्या शेजारी त्याच पाच रंगांत ठिकाणांची नावे असलेला फलक उभारण्यात आला आहे. तसेच, या पाच ठिकाणांमध्ये कोणती गोष्ट प्रसिद्ध आहे त्याचे चित्रही या फलक व मनोऱ्यावर काढण्यात आले आहे. उदाहरणार्थ, अलिबागला पिवळा रंग असून येथे शंख-शिंपले मिळतात म्हणून पिवळय़ा रंगात शंख-शिंपले दाखविण्यात आले आहेत. त्या-त्या रंगाचा दिवा या फलकाच्या मागे बसवण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी जाणारी प्रवासी बोट एखाद्या प्रवेशद्वारी आली असेल त्याचा दिवा लागेल आणि प्रवाशांना कळेल की कोणती बोट आली आहे. हे दिवे सौर-ऊर्जेवर चालणारे असल्याने वीज बचतही होणार आहे. अशी माहिती या प्रकल्पात सहभागी असलेली विद्यार्थिनी मौलश्री शानभाग हिने दिली. ती म्हणाली की, हा प्रयोग करण्यासाठी पुरातत्त्व विभाग, कुलाबा पोलीस, पालिकेचा ए-प्रभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पर्यटन विभाग आदींची परवानगी घेतली होती. यात काही बदल करून आम्ही ते इथे कायमस्वरूपी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.