अमिषा श्रीवास्तव आणि पूजा दास यांचा अभिनव उपक्रम
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशात किंवा मोठय़ा कंपनीत नोकरी करतात, पण मुंबईच्या आयआयटीतून बीटेकची पदवी मिळविलेल्या अमिषा श्रीवास्तव आणि पूजा दास या दोन मुली यासाठी अपवाद ठरल्या आहेत. या दोघींनी चांगली नोकरी पत्करण्यापेक्षा चक्क मुंबईत पाळणाघर सुरू करत नोकरदार पालकांना दिलासा दिला आहे.
अमिषाने बीटेकनंतर मुंबईच्या आयआयटीतूनच एमटेकची पदवी घेतली, तर पूजाने बीटेकनंतर पुढील शिक्षण हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये पूर्ण केले होते. मात्र लहान मुलांची गोडी असल्याने त्यांनी स्वत:चे पाळणाघर सुरू करण्याचा विचार केला. सचिन हांडा यांच्या अहमदाबाद येथील एकलव्य एज्युकेशन फाऊंडेशनच्या मदतीने चांदिवलीतील रहेजा विहार येथे या दोघींनी २६ जूनपासून ‘सॅण्डबॉक्स’ नावाने पाळणाघर सुरू केले आहे.
ज्या कुटुंबांमध्ये नवरा-बायको दोघेही नोकरदार आहेत, अशा पालकांमध्ये मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा पालकांना सॅण्डबॉक्सची मदत होणार आहे. हे पाळणाघर सकाळी ८ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सुरू असते. ६ महिन्यांपासून ते ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना या पाळणाघरात ठेवण्यात येत आहे.
अनेक पाळणाघरात मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल असे कोणतेही उपक्रम चालवले जात नाहीत. काही ठिकाणी तर मुलांची देखभालही व्यवस्थित करण्यात येत नाही. यामुळे मुलाला शाळेत दाखल केल्यानंतर पालकांना त्यांच्या अभ्यासात प्रगती दिसून येत नाही. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही पाळणाघरात मुलांच्या बुद्धीला खाद्य देणारे अनेक खेळ ठेवले आहेत, असे अमिषा यांनी सांगितले. माझ्या वयाचे अनेक तरुण- तरुणी आयआयटीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिका किंवा इतर ठिकाणी नोकरी करतात, मात्र आम्ही दोघींनी यापेक्षा वेगळा विचार करून पाळणाघर सुरू करण्याचे ठरवले. सॅण्डबॉक्समध्ये आम्ही मुलांचा शारीरिक-बौद्धिक विकास, संवाद कौशल्य, सर्जनशीलता, इंग्रजी भाषेची गोडी अशा प्रकारचे शिक्षण देतो. त्यामुळे अवघ्या १०-१२ दिवसांत १५ मुलांनी येथे प्रवेश घेतला आहे. आम्ही येत्या काही वर्षांत संपूर्ण भारतात किमान १०० पेक्षा जास्त पाळणाघर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.