मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) निसर्गरम्य निवासी संकुलात आणखी तीन इमारती बांधण्याचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी सीआरझेडचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर या इमारतींच्या बांधकामासाठी तब्बल ८० झाडांची कत्तल करण्यात येणार असून, मुंबईतील सर्वात सुंदर वृक्ष असा किताब मिळविलेल्या जुन्या वटवृक्षालाही त्याची झळ पोचणार आहे. या वसाहतीमधील काही वैज्ञानिकांनीच पालिका आणि संबंधित विभागांकडे तशी तक्रार केली आहे.
टीआयएफआर ही मूलभूत विज्ञानात संशोधन करणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक. नेव्हीनगरमधील या संस्थेच्या समोरच वैज्ञानिकांची वसाहत आहे. काही वैज्ञानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार तेथे वसतिगृह, प्रयोगशाळा आणि समाजकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी संस्थेने निवडलेली जागा चुकीची असून त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत आहे. वसाहतीची जागा सीआरझेड -३ मध्ये येत असल्याचे महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २०जानेवारी २०१०च्या पत्रात नमूद आहे. मात्र २०१३च्या कागदपत्रांत हीच जागा सीआरझेड-२मध्ये दाखविण्यात आली आहे. यातून या बांधकामासाठी कागदपत्रांतही फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. अर्थात ती जागा सीआरझेड-२मध्ये जरी येत असली तरी तेथेही बांधकाम करता येणार नाही असे त्यांचे म्हणणे असून, अग्निशमन दलाने सादर केलेल्या पाहणी अहवालातही त्रूटी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या बांधकामासाठी ८० झाडांची कत्तल होणार आहे. वसाहतीमध्ये पक्षांच्या एकूण १४० प्रजाती आढळून येतात. झाडे कापून तेथे इमारती उभ्या केल्यास या पक्षांचे जगणेही धोक्यात येईल,  टीआयएफआरची पालक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अणू ऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांशी याबाबत दूरध्वनी तसेच ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून उत्तर आले नाही. दरम्यान, पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील विशेष कक्षाचे कार्यकारी अभियंता किशोर कोलते यांच्या म्हणण्यानुसार या जागेवर सध्या एकाच इमारतीचा प्रस्ताव देण्यात आला असून, बांधकामास परवानगी देण्यास पालिकेकडून कोणत्याही प्रकारची अडचण असल्याचे दिसून येत नाही. संबंधित प्रस्ताव सादर केलेल्या वास्तुरचनाकारांना राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सीआरझेडबाबतचे स्पष्टता पत्र आणण्यास सांगितल्याचेही कोलते यांनी सांगितले.
तक्रारदारांचे मुख्य आक्षेप
*केंद्र सरकारने संस्थेला हैद्राबाद येथे संकुलासाठी जागा दिलेली असताना विद्यार्थी वस्तीगृह मुंबईतच का उभारणार?
*नियम डावलून बांधकाम करण्याचा अट्टहास का?
*सुचविलेल्या पर्यायी जागेचा विचार का केला जात नाही?
*पालिकेकडे केवळ सातच झाडांची कत्तल होणार,
अशी माहिती असली तरी प्रत्यक्षात ८० झाडांची कत्तल होणार.
*५० मीटरचा व्यास असलेल्या जुन्या वडाच्या झाडालाही इजा पोहचणार.
*एका इमारतीची परवानगी मागत असले तरी अर्थसंकल्पात तीन इमारतींची तरतूद कायम.
*सध्या असलेले बॅडमिंटन कोर्ट प्रस्ताव सादर करताना प्रयोगशाळा म्हणून दाखविण्यात आले आहे.