एक परदेशी नागरिक नऊ वर्षांपूर्वी मुंबईत येतो आणि बेकायदेशीररीत्या आंतरराष्ट्रीय दूरध्वनी केंद्र स्थापन करतो. अमेरिकेसह अन्य देशांत तो तासन्तास सॅटेलाइट फोनच्या आधारे बोलतो. या प्रकरणी गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग कारवाईही करतो. संबंधित परदेशी सूत्रधाराला फरार दाखविले जाते. त्याच्यासोबत अटक झालेल्या दोघाजणांकडून माहिती घेऊन या परदेशी सूत्रधाराचा शोध घेण्याचा अजिबात प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून आले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली येथील युनिटने २००५ मध्ये गुप्तचर विभागाच्या माहितीवरून ओशिवरा येथील बेकायदा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी केंद्र उद्ध्वस्त करून ३० सिम कार्डे, अमेरिकन बनावटीची लाखो रुपयांची सामग्री हस्तगत केली होती. या सिमकार्डाचा वापर करून अमेरिकेत दररोज तब्बल दहा तास बोलणे होत होते. त्यामुळे केंद्र सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची गुप्तचर विभागाची माहिती होती आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हे दूरध्वनी केंद्र स्थापन करण्यामागील मुख्य सूत्रधार केनिथ थिओडोर ऊर्फ केनी हा अमेरिकन नागरिक असल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते. याशिवाय पांडुरंग वामन ठाकूर ऊर्फ बाळा आणि मुकेश भाईलाल वाघेला या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र केनीचा शोध घेण्यात आला नाही.
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यासाठी रेकी करण्यामागे मूळचा पाकिस्तान वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडली असल्याचे स्पष्ट झाले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २००५ ते २००७ या काळात हेडली मुंबईत होता आणि त्याने विविध ठिकाणी जाऊन रेकी केली होती. त्यामुळे केनी म्हणजे हेडलीच नव्हे ना, असा संशयही व्यक्त केला जात होता. आता हा खटला सत्र न्यायालयात उभा राहिला आहे. मात्र या प्रकरणात केनी अद्यापही फरार आहे.