सैफी रुग्णालयाचे स्पष्टीकरण; पुढील उपचार अबुधाबीत

इजिप्तमधील इमान अहमद हिचे वजन अवघ्या दोन महिन्यांत ५०० किलोवरून १७१ किलोवर आणण्यात सफी रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले असून इमानच्या बहिणीने डॉक्टरांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे सैफी रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. डॉक्टरांनी इमानचे वजन कमी व्हावे यासाठी पूर्ण प्रयत्न केले असून यापुढे तिच्यावर अबू धाबीला उपचार करण्यात येतील, असे रुग्णालय व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.

इमानची बहीण शायना सेलीम हिने केलेले आरोपावर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी खंडन केले असून आता भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. याही सैफी रुग्णालयातील डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. सेलीमच्या आरोपामुळे वैद्यकीय पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, अशी भावना शायना एन. सी. यांनी व्यक्त केली. या वेळी सैफी रुग्णालयातील बेरियाट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. मुझ्झफर लकडावालाही उपस्थित होते. इमानवर उपचार करण्यापूर्वी ती बसू शकेल हे शायमाला दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. इमान लगेचच चालू शकेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. इमान सैफी रुग्णालयात उपचार घेऊ शकते, तिला डिस्चार्ज दिलेला नाही. मात्र, शायना इमानला अन्य रुग्णालयात हलविणार असेल तर याबाबत रुग्णालय प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.

परिचारिका भावुक

गेल्या दोन महिन्यांपासून इमानची सेवा करणाऱ्या परिचारिका ती जाणार या भावनेतून भावुक झाल्या आहेत. इमानची सेवा करणाऱ्या परिचारिका शेली कोशी या गेल्या दोन महिन्यांपासून इमानची सेवा करीत आहेत. इमानची भाषा वेगळी असली तरी संवाद साधताना कधीच अडचण आली नाही, असे कोशी यांनी सांगितले.