विधिमंडळ सभागृह चालविण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असताना भाजपचे सदस्य सभागृहात महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळीही गैरहजर राहात असल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. सत्तारूढ पक्षाच्या आणि भाजपच्या प्रत्येक सदस्याने सभागृहात हजर राहिलेच पाहिजे, असा दम त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बुधवारी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदारांना दिल्या आहेत.

सत्तार यांचे तीन तास भाषण!

विधानसभेत तासभरापेक्षा जास्त वेळ सदस्यांकडून भाषण होणे अलीकडच्या काळात काहीसे दुर्मीळच झाले आहे. पण, थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या विधेयकावर काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनीतीन तास भाषण केले. सरकारने नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कायद्यात सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर  सत्तार यांनी तीन तास भाषण केले.

एसटी स्थानकांच्या स्वच्छतेसाठी एकच निविदा

  • राज्यातील बस स्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण राज्यात मिळून एकच निविदा काढणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
  • यवतमाळ जिल्ह्य़ाच्या आर्णी तालुक्यातील बस स्थानकामधील गैरसोयींबाबत ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना रावते यांनी ही घोषणा केली.
  • एसटी स्थानके आणि आगारांमध्ये अस्वच्छता असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. स्थानकांमध्ये पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसतात. हे रोखण्यासाठी तंबाखूमुक्त एसटीकडे वाटचाल सुरू असून बस स्थानकांवर तंबाखूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.