महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने विरारमध्ये एका पत्रकारासह त्याच्या दोन भावांवर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे ही भावंडे वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षांची मुले आहेत. विरार पोलिसांनी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

विरारमधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि पालिकेच्या प्रभाग समितीचे अध्यक्ष पांडुरंग इंगळे यांचा मुलगा सागर याला रविवार रात्री विरारच्या एमबी इस्टेट येथे काही तरुणांनी अडवले. तेथे क्षुल्लक कारणावरून वाद उकरून काढण्यात आला आणि नंतर सावित्रीबाई फुले, अहल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द उच्चारण्यात आले. त्याला सागरने विरोध केल्यावर या तरुणांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान सागर घरी न आल्याने त्याला शोधायला त्याचा पत्रकार भाऊ प्रसेनजीत आणि चेतन गेले. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि भावाच्या मदतीसाठी गेले. मात्र सुमारे वीस-पंचवीस जणांच्या जमावाने या तिघा भावांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या मारहाणीमुळे चेतन बेशुद्ध पडला. गाडय़ामंधून काठय़ा, हॉकी स्टीक, सळ्या आणून ठेवल्या होत्या आणि त्यानेच आम्हाला मारहाण झाल्याचे प्रसेनजीतने सांगितले. त्या वेळी पोलिसांचीे गाडी आल्यावर जमाव पसार झाला. तिन्ही भावांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे.

नग्न धिंड काढण्याचाही प्रयत्न’ 

‘आमचे कपडे फाडून नग्न धिंड काढण्याचाही प्रयत्न झाला. आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत म्हणून क्षुल्लक वाद उकरून आम्हाला मारहाण करण्यात आली. या तरुणांसोबत आमचा कोणताही वाद नाही,’ असेही प्रसेनजीतने सांगितले. या सर्व आरोपींनी मद्यपान केले होते. दरम्यान, या मारहाण प्रकरणातील  मुख्य आरोपी गौरव राऊत फरार झाला आहे. पोलिसांनी शेट्टी ऊर्फ शेल्वम, नॉनी ऊर्फ सागर यशवंत कोरगावकर आणि संतोष सोनावणे यांना अटक केली आहे. त्यांना उद्या, मंगळवारी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे.