निडणुकीच्या प्रचारासाठी सध्या ‘सोशल मीडिया’चा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. यातही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आघाडीवर आहे. यासाठी लागणाऱ्या डेटा कनेक्शन अर्थात मोबाइल इंटरनेटचा वापर गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर मोबाइलमध्ये नव्याने इंटरनेटची जोडणी घेणाऱ्यांची संख्याही एक कोटीच्या वर गेल्याचेही ‘ट्राय’ने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशात भ्रमणधारकांची संख्या सर्वाधिक असली तरी भ्रमणध्वनीवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या डिसेंबर २०१३ पर्यंत तुलनेत कमी होती. ही संख्या जानेवारी २०१४ मध्ये ७० लाखांनी वाढल्याचे ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया’ (ट्राय)ने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानुसार भ्रमणध्वनी वर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जानेवारी महिन्यातच एक कोटी २३ लाखांच्या घरात पोहचली आहे. दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांच्या मते ही वाढ सर्वाधिक असून ती एकदम झपाटय़ाने झाली आहे.
‘इंटरनेट अँड मोबाइल असोशिएशन ऑफ इंडिया’ (आयएमईआय)च्या अंदाजानुसार मेाबइलमध्ये इंटरनेट वापऱ्यांची संख्या जूनमध्ये एक कोटी ६५ लाखांपर्यंत पोहोचणार आहे. ही संख्या वाढण्यामागील अनेक कारणांपैकी निवडणूक हेही एक कारण असल्याचे जाणकारांचे मत आहे. मार्च अखेरीसपर्यंत डिसेंबर २०१३च्या तुलनेत इंटरनेटचा वापर सुमारे ४० टक्क्यांनी वाढल्याचे एका सर्वेक्षणात दिसून येत आहे. तर तब्बल ४५ टक्के ग्राहकांनी या कालावधीत टूजीचे कनेक्शन थ्रीजीमध्ये बदलून घेतल्याचेही समोर आले आहे.
या निवडणुकीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहाचण्यासाठी सोशलमीडिया हा भाग खूप महत्त्वाचा ठरला आहे. या माध्यमाचा वापर सर्वच राजकीय पक्षांनी केला. सर्वसामान्य नागरिकानीही आपल्या भ्रमणध्वनीमध्ये इंटरनेटची जोडणी मोठय़ा प्रमाणात केल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसत असल्याचे एका सर्वेक्षण कंपनीने नमूद केले आहे. याबाबत भ्रमणध्वनी कंपन्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेटचा वापर सातत्याने वाढत आहे, असे एका कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकी निमित्त काही ऑफर्स
निवडणुकी निमित्त काही भ्रमणध्वनी कंपन्यांनी इंटरनेटसाठी ऑफर्स देऊ केल्या आहेत. ‘एमटीएनएल’ने  प्रीपेड ग्राहकांसाठी (थ्रीजी डेटा) सुरू करण्यासाठी ५० एमबी थ्रीजी डेटा जास्तीचा देण्यात येणार आहे. ही ऑफर २४ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत असणार आहे. यासाठी १०० रूपयांचा डेटा पॅक खरेदी करावा लागेल. लोकांनी मतदानापूर्वी आपल्या विभागातील उमेदवारांची माहिती वाचावी असा उद्देश समोर ठेवून ‘एअरटेल’ने मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळात ५० एमबी डेटा मोफत उपलब्ध करून दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक वायरलेस इंटरनेटधारक
जानेवारी महिन्यात वायरलेस इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या वाढीपैकी सर्वाधिक वाढ ही पश्चिम बंगालमध्ये झाल्याचे ‘ट्राय’ने सादर केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये नऊ लाख आठ हजार ४७१ वायरलेस इंटरनेट वापरकर्ते तर मुंबई सर्कलमध्ये दोन लाख आठ हजार ४८ वापरकर्ते वाढले आहेत. गुजरात सर्कलमध्ये पाच लाख ७८ हजार ३०१ वापरकर्ते वाढल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण देशात एकूण ७० लाख १६ हजार ५५६ वापरकर्ते वाढल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.