राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१५ पासून सहा टक्के महागाई भत्तावाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून वित्त विभागाने शुक्रवारी तसा आदेश जारी केला. ही वाढ १ फेब्रुवारीपासून रोखीने मिळणार आहे, तर मागील सात महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षांत जानेवारी व जुलैमध्ये दोन वेळी महागाई भत्त्यात सहा-सहा टक्के वाढ केली होती. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जानेवारीमधील सहा टक्के वाढ ऑक्टोबरपासून लागू केली. मागील नऊ महिन्यांची थकबाकी जानेवारी १६ मध्ये दिली; परंतु जुलैची वाढ दिलेली नव्हती.

राज्य सरकारने कर्मचारी व अधिकाऱ्यांना जुलैपासून महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११३ टक्क्यावरून ११९ टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून रोखीने म्हणजे मार्च महिन्याच्या वेतनापासून वाढ मिळेल, तर जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीतील सात महिन्यांच्या थकबाकीबाबतचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल, असे वित्त विभागाच्या आदेशात म्हटले आहे.