कामाचा ताण, वाढते विवाह वय यामुळे प्रजननक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष

बदललेली जीवनशैली, कामाच्या ठिकाणी वाढलेली स्पर्धा आणि त्यामुळे विवाहाचे वाढलेले वय अशा विविध कारणांमुळे प्रजननक्षमता कमकुवत होऊन दाम्पत्यांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वाढते आहे. केवळ गर्भधारणाच नव्हे तर वयाच्या पस्तिशीनंतर प्रसूतीसाठीही अडचणींना समोरे जावे लागते. नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचणी येत असल्याने आयव्हीएफ म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या तंत्राद्वारे कृत्रिम गर्भधारणा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात ९ ते १० टक्के, तर भारतात १५ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्येतून जावे लागते. यामुळे दाम्पत्ये सध्या आयव्हीएफकडे वळत आहेत. गेल्या पाच वर्षांत एकटय़ा मुंबईत आयव्हीएफकरिता ३४,३५५ इतकी नोंदणी झाल्याची माहिती आहे. आयव्हीएफ केंद्रांमध्ये अपत्यप्राप्तीसाठी येणाऱ्या दाम्पत्यांचे वय ३५ ते ४० किंवा त्याहून जास्त असल्याचा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अनुभव आहे. वयाच्या तिशीनंतर महिलेला रक्तदाब, स्थुलता यांसारखे आजार सुरू होतात. त्यामुळे या काळात नैसर्गिक गर्भधारणा होणे कठीण होते.

‘स्पर्धेच्या या काळात प्रत्येक जण आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ‘धावाधाव’ करीत आहे. कार्यालयातील कामाचा ताण, ठरविलेले ध्येय पूर्ण करण्याच्या नादात बदललेल्या जेवणाच्या वेळा, साठविलेले अन्नपदार्थ खाण्याकडे कल या कारणांमुळे आरोग्य बिघडत चालले आहे. वाढलेल्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी तंबाखू, दारू आदी व्यसनांचा आधार घेतला जातो. यामुळे अनेक आजार उद्भवतात. या जीवनशैलीजन्य आजारांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात व नैसर्गिक गर्भधारणेत अडचणी येतात,’ अशा शब्दांत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद तलाठी यांनी या प्रश्नाची कारणमीमांसा केली.

सध्या कामाचा ताणतणाव वाढला आहे. याचा परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. चांगली नोकरी, चांगल्या पगाराच्या मागे धावणारे विवाहाचा निर्णयही उशिरा घेतात. त्यानंतर मुलाचाही निर्णय लवकर घ्यायचा नसल्याने नैसर्गिक गर्भधारणा होत नाही व अशा जोडप्यांना आयव्हीएफची मदत घ्यावी लागते. सध्याच्या महिलांमध्ये स्थुलता या आजाराचे प्रमाण अधिक दिसत आहे. जास्त वजन असल्याने स्त्रीबीज व शुक्राणूंचे फलन होत नाही.  त्यामुळे अशा महिलांना प्रथम वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो, असे आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. देविका चोप्रा यांनी सांगितले.

यापूर्वी महिलांसाठी गर्भधारणेचे वय साधारणपणे ३० होते. मात्र करिअर आणि कामाचा ताण पाहता हे वय पस्तिशीपर्यंत पोहोचले आहे. सुदृढ मूल आणि नैसर्गिक प्रसूती हवी असल्यास विवाहानंतर काही वर्षांत पहिले मूल होऊ  द्यावे. मात्र वयाच्या पस्तिशीत पहिले मूल आले तर प्रसूतीसाठी अनेक धोके असतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.

वंध्यत्वाची कारणे

* बहुतेक आजार हे वयाच्या पस्तिशीनंतर सुरू होतात. त्यात सध्या विवाहाचे वयही वाढले असल्याने त्यानंतर आणखी काही वर्षांनी मुलाला जन्म देईपर्यंत महिला चाळिशीपर्यंत पोहोचते.

* या काळात महिलांच्या हाडांवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती करणे अवघड जाते.

* सिझेरियनमुळे अ‍ॅनिमियासारखे आजार उद्भवतात.

* प्रजनन अवयवांमधील जंतुसंसर्ग, महिलांच्या गर्भपिशवीचा आजार, स्त्री-बीजांमधील दोष यामुळे नैसर्गिक गर्भधारणा होत नाही.