निवृत्त पोलीस, लष्करी अधिकाऱ्यांचे जाधव कुटुंबियांना पाठबळ ; मित्रांकडून ‘घरवापसी’ मोहिमेचे प्रयत्न

निष्पक्षपणे खटला चालवून अतिरेक्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी भारत देतो. पण पाकिस्तानात तसे होत नाही. भारतीय नागरिक पकडायचे, देशविघातक कारवाया करण्याच्या खोटय़ा आरोपात गुंतवून कठोर शिक्षा द्यायची आणि संपूर्ण देशाला(भारत) बदनाम करायचे, यात पाकिस्तानचा हातखंडा आहे. हे आता चालणार नाही. आम्ही कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे आहोत. भारत सरकारच्या प्रयत्नांना निश्चित यश येईल आणि कुलभूषण सुखरूपपणे मायदेशी परततील.. ही प्रतिक्रिया आहे एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची. गेल्या दोन दिवसांत अनेक निवृत्त पोलीस, लष्करातील अधिकारी जाधव यांच्या पवई येथील निवासस्थानी धडकले आणि पाठिंबा व्यक्त केला. दरम्यान, कुलभूषण सुखरूप सुटावेत या मागणीसाठी त्यांचा मित्रपरिवार चळवळ उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.

मंगळवारीही पवई येथील सिल्व्हर ओक इमारतीबाहेर स्थानिक पोलिसांचा खडा पहारा होता. इमारतीत विचारपूस केल्याशिवाय कोणालाही आत सोडले जात नव्हते. जाधव यांच्याकडे आलेल्यांना तर घर बंद आहे, जाधव कुटुंब इथे नाही, असे इमारतीचा रखवालदार सांगत होता आणि आल्यापावली माघारी धाडत होता. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच जाधव कुटुंब मुंबईबाहेर पडले.

जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्याचे कळताच हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी सुधीर शेट्टी मंगळवारी सिल्व्हर ओक इमारतीत आले होते. त्यांनी जाधव यांना पाकिस्तानने फसविले आहे, अशी प्रतिक्रिया देत पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासोबत निवृत पोलीस अधिकारीही तेथे आले होते. त्यांनीही आपला पाठिंबा देत जाधव यांना परत आणण्यासाठीच्या चळवळीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.

ना. म. जोशी मार्गावरील पोलीस वसाहतीत जाधव यांचे बालपण गेले. या परिसरात त्यांचे बालपणीचा मित्रपरिवार मोठय़ा संख्येने आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना पाकिस्तानने अटक केली तेव्हाही या मित्र परिवाराने स्वाक्षरी मोहीम घेतली होती. आता फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.

जाधव यांचे बालपणीचे मित्र तुळशीदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण किंग जॉर्ज विद्यालय आणि रुईया महाविद्यालयात शिकला. एनडीएचा फॉर्म भरण्यापासून ते तो नौदल अधिकारी होईपर्यंतचा त्याचा प्रवास आम्हीही अनुभवला. एरवी लष्करात भरती झाल्यानंतरचे प्रशिक्षण खडतर असते हे नुसते ऐकले होते. पण भूषणमुळे आम्हाला त्याची प्रचीती आली. तो सुट्टीवर येई तेव्हा आम्ही खूप धम्माल करू. नौदलात ठरावीक वष्रे काम केल्यानंतर निवृत्ती घेणार आणि व्यवसाय करणार, असे भूषण नेहमी सांगे. व्यवसाय करायचा हे त्याने खूप तरुण वयातच ठरवले होते, पवार सांगत होते. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू करण्याची तयारी त्यांच्या मित्रांनी केली आहे.

  • जाधव भारतीय गुप्तहेर होते आणि ते पाकिस्तानात घातपाती कारवाया करण्याच्या विचारात होते हा दावा या मित्रपरिवाराच्या पचनी पडलेला नाही.
  • पाकिस्तानने त्यांना फसवले याच मतावर सर्व ठाम आहेत. त्यांच्या सुटकेसाठी पुन्हा एकदा चळवळ उभी करण्याचा विचार मित्रपरिवाराने केला आहे. स्वाक्षरी मोहीम, मूक मोर्चाची आखणी सध्या सुरू आहे.
  • समाजमाध्यमांमधूनही या चळवळीत जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले जाणार आहे.