सांताक्रूझ कालिना येथील मोक्याचा भूखंड इंडिया बुल्सला आंदण देऊन त्या मोबदल्यात अडीच कोटींची लाच स्वीकारल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुळत: महसूल विभागाच्या मालकीचा असलेला हा भूखंड परत घ्यावा या दिशेने प्रयत्न केले जाणार आहेत.  हा मोक्याचा भूखंड इंडिया बुल्सच्या घशात घालताना हस्तांतरण शुल्कही शासनाला अदा करण्यात न आल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे.राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ही बाब मान्य केली. या भूखंडापोटी अनर्जित रक्कम भरली न गेल्याचे शासनाने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले.  चार एकरचा हा भूखंड महसूल विभागाने राज्य शासनाच्या मध्यवर्ती ग्रंथालयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिला होता.