उद्योजकतेला प्राधान्य देण्याचा उपक्रम; ‘ब्रेन ड्रेन’ कमी होऊन ‘ब्रेन गेन’ला सुरुवात

एकेकाळी अभियंता घडवणारी ख्यातकिर्त संस्था म्हणून मुंबईची ‘आयआयटी’ देशात प्रसिद्ध होती. पुढे संशोधनावर आधरित शिक्षण व्यवस्थेमुळे जगभरात आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सन्मानाने नोकऱ्या मिळू लागल्या आणि येथून परदेशात मोठय़ा प्रमाणात ब्रेन ड्रेन होऊ लागले. या परिस्थितीत आता वेगाने बदल होत असून आयआयटीने ‘साईन’च्या माध्यमातून उद्योजगतेला प्राधान्य देण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या काही वर्षांत परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या खालावून ‘ब्रेन गेन’ चा प्रवास सुरु झाला आहे. आयआयटीच्या साईनमधील ९९ बिझनेस बाळांनी गरुड भरारी घेण्यास सुरुवात केली असून त्यांच्या उद्योगाची उलाढाल आता साडेपाचशे कोटींहून अधिक झाली आहे. या उद्योगांमध्ये जवळपास अडीच हजाराहून अधिकजणांना नोकऱ्याही मिळाल्या असून आयआयटीमधून शिकून बाहेर पडणारे बहुतेकजण आता स्वत:चा उद्योग सुरु करण्याच्या मनस्थितीत आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’वा स्टार्ट अप, च्या घोषणेपूर्वी कितीतरी आधी आयआयटीतील उद्योजगता जागी झाली होती. २००४ मध्ये बिझनेस इनक्युबेटर सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. ‘साईन’ (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँण्ड आंत्रप्रिनरशीप) असे तिचे नाव होते. १९८५-८६ च्या दरम्यान अमेरिकेत या संकल्पनेचा जन्म झाला तेव्हा हुषार विद्यार्थींना सर्व तांत्रिक आर्थिक पाठबळ देऊन उद्योग उभारणी हे लक्ष्य होते. तेथील उद्योग जगतानेही यात मोठा पुढाकार घेतला होता. अमेरिकेतील एमआयटी, स्टॅनफोर्डपासून कोणत्याही मोठय़ा शिक्षण संस्था घेतल्या तर त्यांची वार्षिक उलाढाल ही किमान दोन ट्रिलयन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे दिसून येईल. त्याच धर्तीवर आयआयटीमध्ये ‘साईन’ची निर्मिती करण्यात आली असून यात आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. येथील सीएसआरईच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर पंधरा हजार चौरस फुटात ‘साईन’ दिमाखात उभी आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाला शोभतील अशा मिटिंग व कॉन्फरन्स रुम, अद्यावत सुविधांनी सुसज्ज असणारी कंपन्यांसाठीची कार्यालये, संशोधनासाठीची व्यवस्था असून सध्या या सेंटरमध्ये २८ वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या (इनक्युबीटीज) कार्यरत आहेत. आयआयटीचे विद्यार्थी असणे ही प्रमुख अट असून ‘साईन’मध्ये कंपन्यांना अनक्युबिटी, प्री इनक्युबिटी किंवा व्हच्र्यअल इनक्युबिटी म्हणून समावेश केला जात असल्याचे साईनचे प्रमुख प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे यांनी सांगितले. ज्यांना व्यवसाय करायचा असतो त्यांची योग्य पद्धतीने निवड केली जाते. त्यांना दोन मेंटॉर तसेच व्यवसायासाठी कार्यायल अल्प भाडय़ात तीन वर्षांसाठी दिले जाते. व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी गरजेनुसार दहा लाखांपर्यंत मदत केली जाते असे मिलिंद अत्रे यांनी सांगितले. गेल्या बारा वर्षांत ९९ बिझनेस बाळ ‘साईन’ने जन्माला घातली असून यातील काही लोकांची उलाढाल पन्नास कोटींपेक्षा जास्त झाली आहे. दोन ते पाच कोटींची उलाढाल असलेल्यांची संख्या तीसपेक्षा जास्त असून आगामी काळात अधिकाधिक आयआयटीयन उद्योजग निर्माण करण्याला आमचे प्राधान्य राहिले असेही डॉ. अत्रे यांनी सांगितले.