आयसिस समर्थकांच्या अटकेबाबत एटीएसची माहिती
भारतात घातपाती कारवाया करणाऱ्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेनेच आयसिसचा प्रसार सुरू केल्याचे आढळून येत आहे. आयसिस समर्थक असल्याच्या संशयावरून राज्यात अटक करण्यात आलेले तिघेही इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला मुदब्बीर शेख हा या मागील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय अन्य दोघेही मुदब्बीरच्या संपर्कात राहून मुंबईसह राज्यात घातपाती कारवाया करण्यासाठी अधिकाधिक युवकांना भरती होण्यासाठी प्रयत्नशील होते, असे तपासात स्पष्ट झाल्याचेही एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राज्यात आयसिसचा धोका वाढत असल्याची कबुलीही एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर यांनी रविवारी पुण्यात बोलताना दिली.
कर्नाटकातील भटकळ गावात राहणाऱ्या शफी अरमार याच्याशी मुदब्बीर थेट संपर्कात होता. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या रियाझ याची हत्या झाली तर यासिन भटकळ याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली. त्यानंतर शफी हा इंडियन मुजाहिदीनची सूत्रे सांभाळू लागला. त्याने ‘अन्सार-अल-तोहिद’ नावाची नवी दहशतवादी संघटना स्थापन केली. अफगाणिस्तानातून तो या संघटनेची सूत्रे हलवित असून ३० ऑक्टोबर रोजी मालवणीतून गायब झालेल्या अयाझ सुलतानला हीच संघटना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहे. ही संघटना आयसिसशी संबंधित आहे. अयाझला प्रशिक्षण देऊन त्याला भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी पाठविले जाणार होते. परंतु तो गायब झाल्याची माहिती पसरल्यानंतर हा डाव फसल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. मालवणीतून गायब झालेल्या चार तरुणांपैकी दोघे परतले असले तरी ते चेन्नईमार्गे अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होते. परंतु ते गायब झाल्याची आणि त्यांचा एटीएसकडून शोध घेतला जात असल्याचे वृत्त पसरताच ते परत आले. त्यापैकी वाजिदला पुण्यात तर नूर याला मुंबईत ताब्यात घेण्यात आले. तिसरा मोहसिन सय्यद हा गाझियाबादला आणि तेथून दिल्लीला गेला. त्याने नवे सिम कार्ड खरेदी केले. बंगळुरू येथील मौलाना सय्यद अंजार याला फोन केल्यामुळेच अंजार नजरेत आला आणि त्याला अटक झाली. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेशातून खलीद उर्फ रिझवान मोहम्मद अली नवाजुद्दीन याला अटक केली आहे. मालवणीतील चारही युवकांना आपणच आयसिसमध्ये येण्यासाठी भाग पाडल्याची कबुली त्याने दिली आहे. रिझवान आणखीही काही युवकांच्या संपर्कात होता. त्याबद्दल माहिती मिळवून संबंधित युवकांचा शोध जारी करण्यात आला आहे. रिझवानला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात अतिदक्षतेचा इशारा
देशभरातून आयसिसशी संबंधित दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रार्थनास्थळे, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.