आखातातील चाचेगिरीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि प्रसंगी त्यांच्याशी सामना करताना परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी रशिया आणि भारतीय नौदलाचा संयुक्त सराव मुंबईनजीकच्या समुद्रात होणार आहे. ‘इंद्र २०१२’ असे या संयुक्त सरावाचे नाव असून त्यासाठी रशियाच्या तीन नौका मुंबई बंदरात दाखल झाल्या आहेत.
भारत व रशिया यांच्यातील परस्पर लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी २००३ पासून ‘इंद्र’ या नावाने संयुक्त सराव केला जातो. एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधात भारतीय नौदलाबरोबरच रशियन नौदलाच्या नौकाही तैनात आहेत. त्यामुळे चाचेगिरीविरोधातील कारवायांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी यंदा हा संयुक्त सराव होत आहे. २००९ नंतर प्रथमच ‘इंद्र’ उपक्रमांतर्गत सराव होणार आहे.
पाणबुडीविरोधी नौका मार्शल शापोश्निकोव्हसह ‘अलाताव’ आणि ‘इरकुत’ या रशियन नौदलाच्या तीन नौका आणि भारताच्या ‘आयएनएस म्हैसूर’ व ‘आयएनएस तबर’ अशा एकूण पाच युद्धनौका या संयुक्त सरावात सहभागी होतील. २ व ३ डिसेंबर रोजी खोल समुद्रात दोन्ही देशांच्या नौदलाचा संयुक्त सराव होईल. त्यात गोळीबार, हवाई हल्ला संरक्षण आदींचा समावेश
असेल.
चाच्यांचा हल्ला झाल्यास वा त्यांनी एखादे जहाज ओलीस ठेवल्यास कशी कारवाई करायची याबाबतच्या परस्परांच्या पद्धतींचा अभ्यास व माहितीची देवाण-घेवाण यावेळी होईल. त्यामुळे प्रत्यक्ष आखातात वेळप्रसंगी एकमेकांचे सहकार्य घेणे दोन्ही नौदलांना सुलभ होईल, असे आयएनएस म्हैसूरचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन स्वामीनाथन यांनी सांगितले.
भारत हा रशियाचा जुना सहकारी आहे. चाचेगिरीविरोधी मोहिमेत भारतीय नौदल सक्रिय आहे. एडनच्या आखातात टेहेळणीचे काम करताना, चाच्यांविरोधात कारवाई करताना भारतीय नौदलाच्या अनुभवाचा लाभ घेणे या संयुक्त सरावामुळे शक्य होईल, असे रशियाच्या ‘मार्शल शापोश्निकोव्ह’ या नौकेचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन आंद्रे कुझमोत्सोव्ह यांनी सांगितले.हा संयुक्त सराव संपल्यावर ३ डिसेंबर रोजी रशियाच्या या तिन्ही नौका एडनच्या आखाताकडे रवाना होतील. सध्या भारताची आयएनएस गंगा एडनच्या समुद्रात तैनात असून जगभरातील विविध नौदलांच्या सुमारे ४० ते ५० युद्धनौका  चाचेगिरीविरोधात येथे गस्तीवर आहेत.