कमांडर दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाष टॉमी यांच्या पाठोपाठ आता भारतीय महिला नौसैनिक विश्वसागरपरिक्रमेच्या मोहिमेवर जाणार आहेत. येत्या वर्षअखेरीस किंवा नव्या वर्षांच्या सुरुवातीस या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी मंगळवारी येथे दिली.
‘म्हादेई’ या शिडनौकेतून विश्वसागरपरिक्रमा करणारे कमांडर दिलीप दोंदे यांच्या अनुभवांना लेखनरूप लाभलेल्या ‘द फर्स्ट इंडियन : स्टोरी ऑफ द फर्स्ट इंडियन सोलो सर्कमनेविगेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते पार पडले. त्या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या सागरपरिक्रमेसाठी महिला नौसैनिकांचा चमू निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नौदलातील महिलांना स्वत:हून यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांत प्रशिक्षणालाही सुरुवात होईल.
सागरी धाडस समाजामध्ये रुजविण्यासाठी नौदलाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला असून ही मोहीम हा त्याचाच एक भाग आहे. शिवाय येणाऱ्या काळात सागरी धाडसासाठी सामान्यजनांनाही प्रोत्साहन द्यावे, असा नौदलाचा विचार असून त्यासाठी स्थानिक पातळीवर संस्थांशी बोलणी सुरू आहेत. सागर किनाऱ्यावरील शहरांमध्ये नौकानयनासाठी मरिनाची सोय असते. तशी ती मुंबईतही असावी, असेही नौदलाने सुचविले आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत, असेही अ‍ॅडमिरल चोप्रा म्हणाले.
दोंदे याप्रसंगी म्हणाले की, नौसैनिक मुलींची मोहिमेसाठी प्रशिक्षणाची तयारी आपण दर्शविली आहे. यासाठी प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष शीडनौका चालविणे हेच असते. याचे प्रशिक्षण बंद वर्गात होऊ शकत नाही.

पहिली खासगी सागरधाडस मोहीमही!
सध्या आणखी एका सागरी धाडस मोहिमेची तयारी सुरू असल्याची माहिती ‘म्हादेई’चे  निर्माणकर्ते रत्नाकर दांडेकर यांनी दिली. मात्र ही पहिलीच खासगी सागरीधाडस मोहीम असेल असेही ते म्हणाले. त्या मोहिमेसाठीच्या नौकेची निर्मिती करण्याचे कामही त्यांच्याचकडे आले आहे. शिवाय म्हादेईच्या यशानंतर आणखीही काही प्रकल्पांचे काम आल्याचे ते म्हणाले.