मुंबईतल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर सोनं तस्करी करणाऱ्या दोन हायप्रोफाईल महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. एअरपोर्टच्या कस्टम विभागानं दिलेल्या माहितीनुसार या दोन हायप्रोफाईल महिला भारतीय वंशाच्या आहेत आणि सोनं तस्करीचं काम करतात, या तस्करीचा मास्टरमाईंड समोर आलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतो आहे.

या दोन महिलांच्या अटकेमुळे सोनं तस्करीचं रॅकेट समोर आलं आहे. सिंगापूरहून या दोन हायप्रोफाईल महिला मुंबई एअरपोर्टवर पोहचल्या तेव्हा कस्टमच्या अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला, ज्यानंतर या दोन्ही महिलांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये या दोन महिलांच्या अंतर्वस्त्रामधून चार किलो सोनं मिळालं आहे, या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी २० लाख रूपये आहे.

पोलिसांनी या महिलांची वाट बघणाऱ्या एका माणसालाही अटक केली आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला हे सोनं भाईंदरच्या एका सराफाला देणार होत्या, पोलीस सराफाचा शोध घेत भाईंदरलाही पोहचले मात्र तिथे त्याचं ज्वेलरी शॉप बंद होतं आणि तो फरार झाला होता अशीही माहिती मिळाली आहे त्यामुळे पोलिसांनी हे ज्वेलर्स सील केलं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार या दोन्ही हायप्रोफाईल महिला मलेशियात वास्तव्य करणाऱ्या आहेत. शांतालक्ष्मी सुब्रमण्यम आणि मॅगिस्वारी जयरमन अशी या अटक करण्यात आलेल्या महिलांची नावं आहेत. सुरूवातीला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी शांतालक्ष्मी सुब्रमण्यमला हटकलं आणि तिची चौकशी सुरू केली त्यानंतर तिनं तिची सहकारी महिला मॅगिस्वारी कस्टमच्या विभागाबाहेर गेली आहे असं सांगितलं ज्यानंतर तातडीनं मॅगिस्वारीलाही पकडण्यात आलं. सोनं भाईंदरमध्ये देऊन या दोन्ही महिला सिंगापूरला परतणार होत्या. या दोन महिलांना कोर्टातही हजर करण्यात आलं असून कोर्टानं या दोघींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.