आठवड्याभरापूर्वीच केंद्र सरकारने विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची ‘नो फ्लाय’ लिस्ट जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीच्या क्रू मेंबरने एका बेलगाम प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी जयपूर-मुंबई (6E-394) या विमानातून प्रवास करताना संबंधीत प्रवाशाने विमानातील क्रू मेंबर्सशी अरेरावीची भाषा केली होती.

विलेपार्ले येथिल विमानतळ पोलिसांमध्ये इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. रिंकी ठाकूर या महिलविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलेने विमानात गैरवर्तन करीत नियमावलींचे पालन करण्यास नकार दिला होता.

क्रू मेंबर्सच्या तक्रारीनुसार, विमान सुरु होण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रिकॉशनरी डेमोच्या वेळी रिंकू ठाकूर ही महिला शांत बसत नव्हती. मला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे ती वारंवार सांगत होती. त्याचवेळी ती ताबडतोब पिण्याचे पाणी देण्याची मागणी करीत होती. त्यानंतर क्रू मेंबर तिच्याजवळ गेल्यानंतर ती त्यांच्यावर भडकली. असे या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारनंतर संबंधित महिला प्रवाशाला विमानातून उतरवून विमानतळ पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सोमवारी, रात्री ८.३० वाजता ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर रिंकू यांनी दुसऱ्या एका क्रू मेंबर विरोधात गैरवर्तन केल्याची विरोधी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी प्रवाशी महिला आणि क्रू मेंबर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करुन घेतले. याप्रकरणी विमान कंपनीने मात्र, बोलण्यास नकार दिला आहे.